
जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर पुरा भागात एका घरासमोर उभे केलेले साडेचार लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर आणि ट्रॉली (टॅली) अज्ञात चोरट्याने लबाडीच्या उद्देशाने चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश शिवराज चव्हाण (वय ४५, रा. आनंद नगर, जामनेर) यांनी या संदर्भात पोलिसांत रीतसर तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, जामनेर पुरा येथील जितेश राजपूत यांच्या घरासमोरील सार्वजनिक जागेत त्यांचे ट्रॅक्टर पार्क केलेले होते. दिनांक २८ मे रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते २७ मे रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या दरम्यानच्या कालावधीत कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची कोणतीही संमती न घेता सदर वाहन चोरून नेले.
चोरीला गेलेल्या वाहनामध्ये ४ लाख ५० हजार रूपये किमतीचे निळ्या रंगाचे, त्यावर काळा पट्टा असलेले आणि ‘फार्मट्रॅक ५० पॉवरमॅक्स’ असे नाव लिहिलेले ट्रॅक्टर व सोबतची टॅली (ट्रॉली) यांचा समावेश आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक इमरान सैय्यद हे करीत आहे.



