पाचोरा येथे जागतिक ग्राहक हक्कदिन साजरा

पाचोरा (प्रतिनिधी) येथे जागतिक ग्राहक हक्कदिन नुकताच तहसील कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष डॉ. अनिल देशमुख तर प्रमुखपाहुणे म्हणून तहसीलदार कैलास चावडे,ग्राहक पंचायत महिला संघटक ज्योती महालपुरे हे उपस्थित होते.

 

यावेळी व्यासपीठावर डॉ. प्रवीण माळी जिल्हा प्रतिनिधी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आबासाहेब सूर्यवंशी, नायब तहसीलदार श्री.कडनोर हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वजन काटा व मापाचे पूजनाने झाली. यावेळी ज्योती महालपुरे यांनी ग्राहकांची फसवणूक त्यावर जागरूकता, ग्राहकाची गरज त्यासाठी मदतीला असणारी ग्राहक पंचायत संबंधी कायद्यांवर विश्लेषण केले. डॉ. प्रवीण माळी यांनी जागतिक कायद्याची निर्मिती व ग्राहक हक्क याविषयी मार्गदर्शन केले. तर प्रसिद्धी प्रमुख आबासाहेब सूर्यवंशी यांनी बदलत्या काळानुसार वजन माप विभाग व अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाची जबाबदारी, बाजारात खुल्यावर आणि गुणवत्ता न तपासता बर्फ़ व दुधा पासून विक्री होणारे शीतपेय, खाद्य पदार्थ संबंधी, तसेच हात गाड्यांवर आईस गोळा,कुल्फी विक्रीतून लोकांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्यावर काम करणेसाठी प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले.

 

मार्गदर्शक भाषणात तहसीलदार कैलास चावडे म्हणाले की, जागतिक ग्राहक दिनाचे कार्यक्रमाचे श्रेय हे संपूर्ण अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष डॉ अनिल देशमुख व त्यांचे सर्व टीमचे असल्याचे प्रतिपादन केले. डॉ. देशमुख यांनी अत्यंत साध्या व सोप्या भाषेत अनेक संत महात्म्यांच्या ओव्या व त्यातून ग्राहक जागृती ,ज्याला बाजार समजला त्याला सर्वच क्षेत्रातील सर्वांगीण ज्ञान प्राप्त होत, असल्याचे सांगितले. यावेळी अ.भा. ग्राहक पंचायतीचे सचिव संजय पाटील, संघटक शरद गीते,डॉ मुकेश तेली,राजेंद्र प्रजापत, धनराज पाटील, वजनमाप व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, रेशन दुकानदार,केरोसीन विक्रेते व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पुरवठा विभागाचे श्री.आंदळे यांनी तर आभार प्रदर्शन नायब तहसीलदार श्री कडनोर यांनी मानले.

Add Comment

Protected Content