पाचोरा पंचायत समितीच्या बैठकीत बीडीओंच्या कारभाराचे वाभाडे

पाचोरा प्रतिनिधी । येथील पंचायत समितीच्या आजच्या बैठकीत गटविकास अधिकार्‍यांच्या कारभाराचे वाभाडे काढण्यात आले. पाचोरा पंचायत समितीच्या वतीने ग्रामपंचायतीत शासनाच्या विविध योजना अंतर्गत रस्ते घरकुल योजना, १४ व १५ वित्त आयोग विकास कामे, विहीरी, गोठाशेड वाटप, शालेय वाॅल कंपाऊड बांधकाम याबाबत आमदार किशोर पाटील यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जि. प. सदस्य पदमसिंग पाटील, रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपूत, अॅड. अभय पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरूण पाटील, शिवसेना शहर अध्यक्ष किशोर बारावकर, जिल्हा उपप्रमुख गणेश पाटील, गटविकास अधिकारी अतुल पाटील उपस्थित होते. या बैठकीत आमदारांसमोर तक्रारीचा पाढा वाचण्यात आला. तसेच गट विकास अधिकारी हे जनतेच्या तक्रारीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात तसेच अनेक ग्रामसेवक, प्रशासक आपल्या नेमलेल्या ग्रामपंचायतीत नियमित येत नसल्याने जनतेच्या कामे होत नाही. यामुळे गावोगावी स्वच्छतेचा अभाव आणि अतिक्रमणात वाढ होत आहे. याबाबत गट विकास अधिकारी अतुल पाटील यांचे कर्मचार्यांवर नियंत्रण नसल्याने ग्रामपंचायतीत सावळा गोंधळ सुरू आहे. १४ व्या वित्त आयोग अंतर्गत कामाचे नियोजन नाही, विकासाचा आराखडा तयार नाही, ठराविक लाभार्थ्यांनाच विहिरी व गोठाशेड वाटप करून इतरांचे प्रस्ताव नाकारले जात आहे. असे आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गट विकास अधिकारी अतुल पाटील यांच्यावर केले. ग्रामीण भागात ग्रामविकास व रोजगार हमीची कामे, १४ व १५ व्या वित्त आयोगाची कामे सुरू नाहीत, विकासकामांचे आराखडे तयार नाहीत, ग्रामस्थाकडून स्वच्छते बाबत तक्रारी आहेत. वांलकंपाऊड आणि वित्त आयोगाची कामे, रस्ते कागदावर दाखवून पैसा खाण्याचा प्रकार सुरू आहे. मागील काळात विहिरी, गोठाशेड व शौचालयाचा कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. विहिरी व गोठाशेड पैसे घेऊन वर्क ऑर्डर दिल्या जातात विकास कामे निकृष्ट किंवा त्यात भ्रष्टाचार होत असेल तर जनतेच्या तक्रारीच्या आधारे चौकशी करून दोषी आढळल्यास गुन्हे दाखल करून जेल मध्ये टाका. राज्य सरकारच्या आदेशानुसार अतिक्रमित धारकांचे घरे नियमित करा. अशा अनेक सुचना आमदार किशोर पाटील यांनी गट विकास अधिकारी अतुल पाटील यांना दौरे करून विकास कामांचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Protected Content