Home क्राईम चोपडा तालुक्यात अस्वलांच्या टोळीचा धुमाकूळ; दोघांवर हल्ला, शेतमजूर गंभीर जखमी

चोपडा तालुक्यात अस्वलांच्या टोळीचा धुमाकूळ; दोघांवर हल्ला, शेतमजूर गंभीर जखमी

0
6


चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर ३ ते ४ अस्वलांच्या टोळीने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात बढाई पाडा येथील १६ वर्षीय मुलासह ६० वर्षीय शेतमजूर गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चोपडा तालुक्यातील बडवणी तांडा ते बढाई पाडा दरम्यान असलेल्या शेतात मंगळवारी (२५ ऑगस्ट) दुपारी सुमारे १२ वाजता काही मजूर काम करत होते. त्याचवेळी अचानक ३ ते ४ अस्वलांची टोळी शेतात आली आणि मजुरांवर हल्ला केला. या हल्ल्यात राकेश जगदीश पावरा (वय १६, रा. बढाई पाडा) याच्यावर अस्वलाने झडप घातली. यात त्याच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. याचवेळी जवळच काम करत असलेले नाना भारसिंग पावरा (वय ६०, रा. बढाई पाडा) यांच्यावरही अस्वलाने हल्ला केला. त्यांच्या डोक्यावर अस्वलाने जोरदार वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शेतात एकच गोंधळ उडाला. जखमींच्या आरडाओरडीनंतर आजूबाजूच्या शेतात काम करणारे मजूर मदतीसाठी धावून आले. मजुरांनी प्रसंगावधान राखत मोठ्याने आरडाओरड केल्याने अस्वलांची टोळी घाबरून जंगलाच्या दिशेने पळून गेली. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे दोघांवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. तसेच जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. अस्वलांच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे चोपडा तालुक्यात खळबळ उडाली असून, शेतात काम करणाऱ्या मजुरांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. परिसरात अस्वलांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वनविभागाने अस्वलांच्या हालचालींवर तातडीने लक्ष ठेवून शेतकरी व शेतमजुरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound