Home क्राईम जळगावमध्ये जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून निघृण खून ; एमआयडीसी पोलिसांकडून संशयिताला...

जळगावमध्ये जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून निघृण खून ; एमआयडीसी पोलिसांकडून संशयिताला बेड्या

0
5


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका ३९ वर्षीय महिलेचे अचानक गायब झाल्यानंतर अपहरण करून एरंडोल तालुक्यातील पद्मालय परिसरातील घनदाट जंगलात दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत तंतोतंत आणि तांत्रिक विश्लेषण करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. जुन्या प्रेमसंबंधातून हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत या गुन्ह्याचा छडा लावला आहे.

घटनाक्रम पाहता, ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी आठच्या सुमारास फिर्यादी हे कामावर जाण्यासाठी उठले होते. त्यांच्या आईने त्यांच्यासाठी जेवणाचा डबा तयार करून ठेवला होता. फिर्यादी अंघोळ करून बाहेर आले असता त्यांची आई घरात दिसून आली नाही आणि त्यांचा मोबाईल फोन देखील बंद येत होता. त्यानंतर कामावरून परतल्यानंतरही आई घरी न आल्याने आजूबाजूला व नातेवाईकांकडे शोधाशोध करण्यात आली. मात्र कोणतीही माहिती न मिळाल्याने आईचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची खात्री पटली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. परिसरातील सिसिटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या आधारे संशयिताचा शोध सुरू असतानाच १३ सप्टेंबर २०२६ रोजी एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पद्मालय परिसरातील घनदाट जंगलात बेपत्ता महिला कविता अरुण सुतार (वय ३९) यांचा मृतदेह आढळून आला. यावरून अपहृत महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

तपासाची चक्रे अधिक तीव्र करत पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातून सापळा रचून नरेश उर्फ आबा अनिल सोनवणे (वय २९, रा. रेणुका नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, जुन्या प्रेमसंबंधातून कविता सुतार यांचे अपहरण करून पद्मालय जंगलात नेऊन दगडाने ठेचून हत्या केल्याची कबुली त्याने दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी नरेश उर्फ आबा सोनवणे यास तत्काळ अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे करत आहेत.

ही यशस्वी कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुंडलीक धनके, श्रेणी पो.उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस अंमलदार किरण चौधरी, प्रमोद लाडवंजारी, गिरीश पाटील, विशाल कोळी, किरण पाटील आणि गणेश ठाकरे यांच्या पथकाने केली आहे.


Protected Content

Play sound