Home Cities जळगाव जळगाव जिल्हा शासकीय अभियंता पतपेढीतर्फे गुणवंतांचा गौरव

जळगाव जिल्हा शासकीय अभियंता पतपेढीतर्फे गुणवंतांचा गौरव

0
3


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा शासकीय अभियंता सहकारी पतपेढी मर्यादित, जळगावतर्फे अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अभियंता भवन येथे आयोजित या कार्यक्रमात अभियंता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासोबतच गुणवंत सभासद पाल्य, सेवानिवृत्त अभियंता सभासद आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभियंत्यांचा सन्मान करण्यात आला. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कार्याचे स्मरण करून अभियंता क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक तथा मुख्य अभियंता इंजिनिअर राजेश मोरे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्य माहिती आयुक्त व्ही. डी. पाटील, जळगाव जिल्हा शासकीय अभियंता सहकारी पतपेढीचे व्हाइस चेअरमन इंजिनिअर चंद्रशेखर तायडे, चेअरमन इंजिनिअर प्रमोद पाटील, संस्थापक चेअरमन तथा आजीव अध्यक्ष इंजिनिअर साहेबराव पाटील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता इंजिनिअर राहुल पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात अभियंता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या विशेष गौरव पुरस्कार माय माती फाउंडेशन, जळगावचे सुप्रभात पाटील यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासोबत रोख ११ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील योगदानाची दखल घेत त्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियंता गौरव पुरस्काराने सहाय्यक अभियंता श्रेणी-१, बांधकाम उत्तर विभाग, जळगाव येथील प्रवीण रघुनाथ बेंडकुळे तसेच गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद प्रकाश पाटील यांना सन्मानित करण्यात आले. अभियंता क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत हा गौरव करण्यात आला. अभियंता दिनाच्या निमित्ताने केवळ पुरस्कार वितरण न करता संस्थेशी संबंधित गुणवंत सभासदांच्या पाल्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त अभियंता सभासदांचा सन्मान करून त्यांच्या प्रदीर्घ सेवेला आदरांजली वाहण्यात आली. अभियंता क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठांचा सन्मान आणि नव्या पिढीतील गुणवंतांना प्रोत्साहन देण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

अभियांत्रिकी क्षेत्राचा देशाच्या आणि समाजाच्या विकासात महत्त्वाचा वाटा असून, पायाभूत सुविधा, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम आणि विविध विकासकामांमध्ये अभियंत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अभियंता दिनाच्या माध्यमातून या क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्याबरोबरच गुणवंतांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इंजिनिअर स्वाती नन्नवरे, इंजिनिअर तुषार राजपूत, इंजिनिअर सचिन भागवत पाटील, इंजिनिअर आरती सूर्यवंशी, इंजिनिअर कुलदीप पाटील, इंजिनिअर हेमंत पवार, इंजिनिअर कामेश पाटील, इंजिनिअर सुभाष चव्हाण आणि इंजिनिअर ब्रह्मानंद तायडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले.


Protected Content

Play sound