


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध न्याय्य मागण्यांसाठी संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला रावेर तालुक्यातील सकल मराठा समाजाने ठाम पाठिंबा दर्शविला आहे. समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक व ठोस निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी करणारे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले.
मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनास आपला ठाम पाठिंबा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आंदोलनाद्वारे मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांचा शासनाने गांभीर्याने विचार करून त्या तातडीने मान्य कराव्यात, अशी आग्रही भूमिका रावेर तालुक्यातील सकल मराठा समाजाने घेतली आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याने शासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. केवळ आश्वासन न देता मागण्यांबाबत ठोस निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली.
रावेर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देताना समाजाच्या विविध घटकांतील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. या वेळी माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील, मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष उमाकांत महाजन, दीपक पाटील, मराठा सेवा संघाचे प्रशांत पाटील, घनश्याम पाटील, पत्रकार शालिक महाजन, बाजार समिती संचालक गणेश महाजन, नगरसेवक राजू ठेकेदार, डॉ. सुरेश पाटील, सी. एस. पाटील आदींसह सकल मराठा समाजाचे नागरिक उपस्थित होते. निवेदनाद्वारे शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला रावेर तालुक्यातील सकल मराठा समाजाचा पाठिंबा कायम राहणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.



