Home Cities मुक्ताईनगर दुष्काळाच्या सावटात वाढदिवसाचा जल्लोष नको ; आ. चंद्रकांत पाटील यांची संवेदनशील भूमिका

दुष्काळाच्या सावटात वाढदिवसाचा जल्लोष नको ; आ. चंद्रकांत पाटील यांची संवेदनशील भूमिका

0
4


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यासह मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघावर सध्या दुष्काळाचे सावट असून, अस्मानी संकटामुळे शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत स्वतःचा वाढदिवस जल्लोषात साजरा करणे योग्य ठरणार नाही, अशी संवेदनशील भूमिका आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे यंदा वाढदिवसानिमित्त मोठे कार्यक्रम, सत्कार, हार-तुरे किंवा अनावश्यक खर्च न करता समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना केले आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस १४ सप्टेंबर रोजी आहे. मात्र, मतदारसंघातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता वाढदिवसाचा मोठा उत्सव किंवा अनावश्यक खर्च टाळण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. वाढदिवसाचा दिवस गरजू घटकांना मदतीचा हात देऊन आणि समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, बळीराजा सध्या अस्मानी संकटांशी सामना करीत आहे. पाऊस-पाण्याची अनिश्चितता, शेतीसमोरील अडचणी आणि आर्थिक संकटामुळे शेतकरी बांधव त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत स्वतःचा वाढदिवस उत्साहात साजरा करणे योग्य वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जनतेचे प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वाद हेच आपल्यासाठी सर्वात मोठे भांडवल असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यासोबत, नेपाळमध्ये अलीकडेच झालेल्या दुर्घटनेत अनेक भारतीय नागरिकांना देखील आपले प्राण गमवावे लागले असून त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी देखील वाढदिवस साजरा करत नसल्याचे आ. चंद्रकांत पाटील यांनी नम्रपणे नमूद केले आहे.

१४ सप्टेंबर रोजी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी कुणीही प्रत्यक्ष भेटीसाठी येऊ नये, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले आहे. वैयक्तिक कारणास्तव ते वाढदिवशी बाहेरगावी राहणार असल्याने कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक आणि नागरिकांनी भेटीसाठी शहरात किंवा त्यांच्या निवासस्थानी गर्दी करू नये, असे सांगण्यात आले आहे. वाढदिवसानिमित्त हार-तुरे, सत्कार आणि अनावश्यक खर्च करण्याऐवजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करावी, गरजू नागरिकांना आवश्यक वस्तूंचे वाटप करावे, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, तसेच रुग्णांना उपचारासाठी आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. याशिवाय आपल्या परिसराच्या गरजेनुसार विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे नम्र आवाहनही कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे.

“माझा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य आणा,” अशी भावना आमदार पाटील यांनी व्यक्त केली आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकरी आर्थिक संकटात असताना वाढदिवसाचा जल्लोष करणे योग्य नाही. त्यामुळे वाढदिवसाचा खर्च टाळून तो पैसा आणि वेळ समाजाच्या उपयोगी आणावा, असे त्यांनी स्पष्ट केले. संकटाच्या काळात जनतेसोबत उभे राहणे, शेतकरी व सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेणे, त्यांच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणे आणि गरजूंच्या मदतीला धावून जाणे, हाच वाढदिवस साजरा करण्याचा खरा मार्ग असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर शहरात कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक आणि नागरिकांनी शुभेच्छा देण्यासाठी शहरात गर्दी करू नये, तसेच त्यांच्या निवासस्थानीही प्रत्यक्ष भेटीसाठी येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाचा व्यक्तिगत आनंद बाजूला ठेवून सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देण्याचा आमदार चंद्रकांत पाटील यांचा निर्णय चर्चेचा विषय ठरत आहे. गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेऊन समाजोपयोगी उपक्रम राबविणे, हाच यंदाच्या वाढदिवसाचा खरा आनंद ठरावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.


Protected Content

Play sound