Home प्रशासन मुक्ताईनगर एमआयडीसीच्या प्रक्रियेला प्रशासकीय पातळीवर वेग

मुक्ताईनगर एमआयडीसीच्या प्रक्रियेला प्रशासकीय पातळीवर वेग

0
9


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यात बहुप्रतिक्षित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) प्रकल्पाच्या उभारणीला अखेर प्रशासकीय पातळीवर मोठी गती मिळाली आहे. या संदर्भात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एक अत्यंत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत एमआयडीसीसाठी प्रस्तावित जागा, जमीन हस्तांतरणाची सद्यस्थिती आणि पुढील प्रशासकीय कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

मुक्ताईनगर येथे सुमारे २५० एकर क्षेत्राचा विचार करून त्यापैकी १३० हेक्टर शासकीय जमीन औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. याप्रसंगी प्रस्तावित जागेची मोजणी, उपलब्ध शासकीय जमीन, हद्द निश्चिती, नकाशे तसेच आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली.

यापूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने एमआयडीसी, महसूल आणि भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने मुक्ताईनगर तालुक्यातील प्रस्तावित जागेची प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली होती. त्या पाहणीदरम्यान शासकीय जमिनीचे सर्वेक्षण, नकाशा तयार करणे आणि पुढील मंजुरीसाठी आवश्यक प्रस्तावांची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर पार पडलेल्या या उच्चस्तरीय आढावा बैठकीमुळे मुक्ताईनगरच्या औद्योगिक विकासाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शासनाच्या अंतिम मान्यतेसाठी आवश्यक असलेला अधिकृत प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे कडक निर्देश या बैठकीत अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जमिनीवर असलेल्या लाभक्षेत्राच्या नोंदी निकाली काढणे तसेच ती जमीन एमआयडीसीकडे विनाअडथळा हस्तांतरित करण्याबाबत यापूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीतही सविस्तर चर्चा झाल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले. मुक्ताईनगर तालुक्याला राष्ट्रीय महामार्ग, लोहमार्ग आणि मध्य प्रदेश सीमेलगतचे मोक्याचे भौगोलिक स्थान लाभले आहे, तसेच प्रस्तावित इंदूर-हैदराबाद मार्गामुळे या भागातील दळणवळणाची क्षमता कमालीची वाढणार असून येथे मोठे उद्योग आकर्षित होण्यासाठी अत्यंत अनुकूल वातावरण आहे.

मुक्ताईनगर तालुक्यात एमआयडीसीची प्रत्यक्ष उभारणी झाल्यास स्थानिक पातळीवर लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांना मोठी चालना मिळणार असून परिसरातील सुशिक्षित तरुणांसाठी रोजगाराच्या हजारो नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या औद्योगिक वसाहतीमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळून मुक्ताईनगर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरील सर्व प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. या उच्चस्तरीय बैठकीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे, प्रादेशिक अधिकारी दिपाली रासवे, प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील, अभियंता गोकुळ महाजन, मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे, शिवसेना विधानसभा संघटक महेंद्र मोंढाळे यांच्यासह महसूल व एमआयडीसी विभागाचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते


Protected Content

Play sound