


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आशिया खंडातील अग्रगण्य आणि विश्वासार्ह मानल्या जाणाऱ्या ‘जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि. जळगाव’ (ग. स. सोसायटी) या संस्थेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ३१ मार्च २०२६ अखेर १४ कोटी ११ लाख ९९ हजार ५२० रुपयांचा निव्वळ नफा मिळवून सहकार क्षेत्रात आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. शासकीय ऑडिटमध्ये सातत्याने ‘अ’ वर्ग राखणाऱ्या या पतपेढीचे खेळते भांडवल १३६२.९६ कोटी रुपयांवर पोहोचले असून, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या अध्यक्ष रागिणी चव्हाण आणि संचालक मंडळाने सभासदांसाठी अनेक मोठ्या आणि महत्त्वपूर्ण कल्याणकारी निर्णयांची घोषणा केली आहे.
संस्थेच्या प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आर्थिक पत्रकानुसार, पतपेढीकडे सध्या ३२,६३० इतकी भक्कम सभासद संख्या आहे. संस्थेकडे ९४२.५६ कोटी रुपयांच्या सभासद वर्गणी व १८३.३५ कोटी रुपयांच्या ठेवी जमा असून, राखीव निधी ४८.३३ कोटी तर एकूण गुंतवणूक १७५.१६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या भक्कम आर्थिक पायामुळेच यंदा सर्व सभासदांना १० टक्के लाभांश (Dividend) वाटप करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक सभासदास १,००० रुपये बैठकी भत्ता दिला जाणार आहे.
सभासदांच्या वाढत्या आर्थिक गरजा लक्षात घेता संचालक मंडळाने कर्ज मर्यादेत मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यानुसार सर्वसामान्य सभासदांसाठी कर्ज मर्यादा १५ लाख रुपयांवरून थेट २० लाख रुपये, तर वर्ग-४ मधील कर्मचाऱ्यांसाठी ७.५० लाख रुपयांवरून १२ लाख रुपये करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. नवीन सभासद नोंदणीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रवेश फी ८,००० रुपयांवरून ४,००० रुपये करण्यात आली आहे. तसेच, ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक आणि अपंग सभासदांना सभेचा भत्ता सुलभतेने मिळावा यासाठी स्वतंत्र बुथ व्यवस्था करण्यात येणार असून ऑनलाईन डिजिटल पेमेंट सुविधाही कार्यान्वित केली जात आहे.
सामाजिक व कौटुंबिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संस्थेने अनेक अभूतपूर्व योजना लागू केल्या आहेत. संस्थेच्या मयत सभासदांचे १०० टक्के कर्ज माफ करण्याची तरतूद करण्यात आली असून, कर्ज नसलेल्या मयत सभासदाच्या कुटुंबास १.५० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. ‘ज्येष्ठ सभासद सन्मान योजने’ अंतर्गत २५ वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांना ५,००१ रुपये तर ३० वर्षे पूर्ण केलेल्यांना ७,००९ रुपयांची सप्रेम भेट दिली जाणार आहे. तसेच ‘राजमाता जिजाऊ शुभमंगल योजने’नुसार मुला-मुलींच्या विवाहासाठी ५,००० रुपयांचे अर्थसहाय्य आणि ८० वर्षांपर्यंतच्या सर्व सभासदांसाठी ५ लाख रुपयांची मोफत अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे.
या सर्व धोरणात्मक निर्णयांची माहिती आणि पत्रकार प्रसिद्धी पत्रक अध्यक्ष रागिणी चव्हाण, उपाध्यक्ष अनिल गायकवाड, सहकार गट अध्यक्ष उदय पाटील, कर्ज समिती अध्यक्ष मनोज माळी, गटनेते अजबसिंग पाटील, कर्मचारी निवारण समिती अध्यक्ष मंगेश भोईटे, लोकसहकार गट अध्यक्ष मनोजकुमार पाटील यांच्यासह संचालक सुनील सूर्यवंशी, योगेश सनेर, अजयराव सोमवंशी, महेश पाटील, भाईदास पाटील, योगेश इंगळे, अजय देशमुख, विश्वास पाटील, विजय पवार, प्रतिभा सुर्वे, निलेश पाटील, संदीप पाटील व नितीन साठे यांच्या संयुक्त स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.



