Home Uncategorized नवरात्रोत्सवानिमित्त जळगावात ‘नारी शक्ती ग्राम गौरव’ सोहळ्याचे आयोजन 

नवरात्रोत्सवानिमित्त जळगावात ‘नारी शक्ती ग्राम गौरव’ सोहळ्याचे आयोजन 

0
3

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून ‘डीएल सोशल फाऊंडेशन’ (DL Social Foundation) तर्फे जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांसाठी “नारी शक्ती ग्राम गौरव सन्मान सोहळा – २०२६” आयोजित करण्यात येणार आहे. “गावच्या लेकींचा सन्मान, गावाच्या प्रगतीचा अभिमान” या विशेष संकल्पनेवर आधारित या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांच्या असामान्य कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आणि समाजातील इतर महिलांना प्रेरणा देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

शिक्षण, आरोग्य, शेती, व्यवसाय, स्वयंरोजगार, सामाजिक कार्य, क्रीडा, कला-संस्कृती, ग्रामविकास, पर्यावरण यांसारख्या विविध क्षेत्रांत किंवा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन करणाऱ्या महिलांचा या सन्मानासाठी विचार केला जाणार आहे. जिल्ह्याच्या आणि गावाच्या प्रगतीत बहुमोल योगदान देणाऱ्या या रणरागिणींचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला जाणार आहे.

या सन्मान सोहळ्यासाठी जळगाव जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांकडून तसेच त्यांच्या कार्याची माहिती असलेल्या नागरिकांकडून प्रस्ताव मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नागरिकांना आपल्या परिसरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांची नामनिर्देशने सादर करता येतील. प्राप्त झालेल्या सर्व प्रस्तावांची व माहितीची योग्य ती पडताळणी करून संस्थेच्या निर्धारित निकषांनुसार सन्मानार्थी महिलांची अंतिम निवड केली जाणार आहे.

समाजाच्या, कुटुंबाच्या आणि गावाच्या विकासात मोलाचा हातभार लावणाऱ्या महिलांनी तसेच त्यांच्या कार्याची माहिती असलेल्या सुजाण नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डीएल सोशल फाऊंडेशनच्या संचालिका सौ. भावना मैराळे आणि संचालक डॉ. समाधान मैराळे यांनी केले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी किंवा नाव नोंदणीसाठी ७७९६११२८९४ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound