
मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरात ईद मिलादुन्नबीचा सण अत्यंत उत्साहपूर्ण, जल्लोषाच्या आणि शांततामय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत केवळ मुस्लिम बांधवच नव्हे तर विविध धर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत ‘एकता, बंधुता आणि सामाजिक सलोखा‘ या मूल्यांचा एक अनोखा आणि प्रभावी संदेश संपूर्ण जिल्ह्याला दिला.

सकाळी ठरलेल्या वेळेनुसार धार्मिक वातावरणात मिरवणुकीला सुरुवात झाली. पैगंबर हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या या मिरवणुकीत धार्मिक घोषणांसोबतच सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा जयघोष करण्यात आला. शहरातील प्रमुख मार्ग आणि चौक या मिरवणुकीने गजबजले होते. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी विविध संस्था, व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांनी पुष्पवृष्टी करून मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत केले. सर्व समाजातील नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत मुक्ताईनगरची ऐतिहासिक हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. ईद मिलादुन्नबीचा हा सोहळा केवळ एका विशिष्ट धर्मापुरता मर्यादित न राहता, सर्वधर्मीय एकतेचे प्रतीक ठरला. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येत शांतता, बंधुभाव आणि परस्परांप्रती आदर टिकवून ठेवण्याचा संकल्प या निमित्ताने केला. मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नागरिकांनीही अत्यंत शिस्तबद्धतेने आणि शांततेच्या मार्गाने सहभाग नोंदवत पोलिसांना पूर्ण सहकार्य केले.



