Home Cities चोपडा चोपडा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत उत्साहात ; ३९३ प्रकरणांचा यशस्वी निपटारा 

चोपडा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत उत्साहात ; ३९३ प्रकरणांचा यशस्वी निपटारा 

0
13


चोपडा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशान्वये चोपडा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीत दिवाणी, फौजदारी आणि विविध संस्थांच्या दाखलपूर्व प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यात आला. यामध्ये एकूण ३९३ प्रकरणे यशस्वीरीत्या निकाली काढण्यात आली असून, ६५ लाख ८६ हजार ८१४ रुपयांची थकबाकी वसुली झाली आहे.

राष्ट्रीय लोक अदालतीचा प्रारंभ सकाळी १०:३० वाजता झाला. या लोक अदालतीसाठी पॅनल प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश डी. एस. धनगर यांच्यासह पंच म्हणून ॲड. जामसिंग के. बारेला, चोपडा वकील संघाचे सदस्य तथा सरकारी अभियोक्ता नितीन माळी आणि ग्राम विस्तार अधिकारी जे. पी. पाटील यांनी कामकाज पाहिले. चोपडा न्यायालयात प्रलंबित असलेल्या ७०८ दिवाणी व फौजदारी प्रकरणांपैकी ६१ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यात आला. यात १ फौजदारी प्रकरण, ८ धनादेश अनादर प्रकरणे, १९ दिवाणी दावे आणि २ कौटुंबिक वादाच्या प्रकरणांचा समावेश असून यातून १६ लाख ५१ हजार ११४ रुपयांची वसुली झाली.

तसेच दाखलपूर्व प्रकरणांमध्ये बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, बीएसएनएल, महसूल, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (महावितरण) आणि ग्रामपंचायतींच्या वसुलीच्या ७ हजार ४५७ प्रकरणांपैकी ३३२ प्रकरणे आपापसातील संमतीने निकाली काढण्यात आली. या दाखलपूर्व प्रकरणांमधून तब्बल ४९ लाख ३५ हजार ७०० रुपयांची वसुली करण्यात प्रशासनाला यश आले. अशाप्रकारे प्रलंबित व दाखलपूर्व मिळून एकूण ६५ लाख ८६ हजार ८१४ रुपयांची वसुली झाली आहे.

या लोक अदालतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वैवाहिक वादातील दोन प्रकरणांमध्ये यशस्वी समझोता घडवून आणण्यात आला. न्यायाधीशांसह वकिलांच्या मध्यस्थीमुळे दुरावलेल्या दोन जोडप्यांचा संसार पुन्हा सुखाने सुरू झाला, ज्यांचा न्यायालयात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ही प्रकरणे मिटवण्यासाठी अर्जदारांचे वकील ॲड. असीम ए. सय्यद, सामनेवाल्यांचे वकील ॲड. सी. बी. सोनवणे, पॅनल प्रमुख डी. एस. धनगर, पंच ॲड. जे. के. बारेला आणि सरकारी अभियोक्ता नितीन माळी यांनी मोलाचे प्रयत्न केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी बार असोसिएशनचे वकील सदस्य, पोलीस कर्मचारी, सहाय्यक अधीक्षक, न्यायालयीन कर्मचारी, विविध बँकांचे शाखा अधिकारी, महावितरण आणि बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. लोक अदालतीचे काम सुरळीत पार पाडल्याबद्दल पॅनल प्रमुख न्यायाधीश डी. एस. धनगर यांनी सर्वांचे आभार मानले.


Protected Content

Play sound