


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषद प्रशासन हे सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी सदैव कटिबद्ध आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व समस्यांचे नियमानुसार निराकरण करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल. या प्रश्नांवर स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करून एक विशेष कृती आराखडा तयार केला जाईल आणि टप्प्याटप्प्याने त्यावर प्रभावी कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिली आहे.
राज्य सफाई कामगार आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यादरम्यान जिल्हा परिषदेत आयोजित विशेष आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या उच्चस्तरीय बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत बोढरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आणि आयोगाचे विशेष कार्यकारी अधिकारी राजेश सोनवणे यांच्यासह जिल्हा परिषदेचे विविध विभागप्रमुख उपस्थित होते.
या बैठकीमध्ये सफाई कर्मचाऱ्यांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती, वर्ग-४ मधून वर्ग-३ मध्ये मिळणारी पदोन्नती, आश्वासित प्रगती योजनेचे रखडलेले लाभ, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर काम करताना येणाऱ्या व्यावहारिक अडचणी तसेच वारसा हक्काने नियुक्ती देणे यांसारख्या विविध सेवाविषयक प्रश्नांचा प्रामुख्याने समावेश होता.
बैठकीत मार्गदर्शन करताना राज्य सफाई कामगार आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी प्रशासनाला सर्व प्रलंबित प्रकरणांवर गांभीर्याने आणि नियमोचित तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्क आणि लाभ वेळेत मिळावेत यासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
सीईओ करिश्मा नायर यांनी कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक करताना स्पष्ट केले की, सफाई कर्मचारी हे ग्रामीण भागातील स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा मुख्य कणा आहेत. त्यामुळे त्यांच्या सेवाविषयक अडचणी प्राधान्याने सोडवून त्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन पूर्णपणे सकारात्मक भूमिका घेईल.



