Home क्राईम परवान्याविना खत व कीटकनाशकांची अवैध विक्री ; गुजरातच्या कंपनीविरुद्ध जळगावात गुन्हा दाखल

परवान्याविना खत व कीटकनाशकांची अवैध विक्री ; गुजरातच्या कंपनीविरुद्ध जळगावात गुन्हा दाखल

0
7


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्रात कोणताही वैध परवाना नसताना खत आणि कीटकनाशकांची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी गुजरातमधील एका नामांकित कंपनीविरुद्ध जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘सिडनी फॉर्म्युलेशन अँड केमिकल्स’ (Sydney Formulation & Chemicals) असे गुन्हा दाखल झालेल्या गुजरातच्या कंपनीचे नाव आहे. कृषी विभागाने मोठ्या शिताफीने रचलेल्या जाळ्यात अडकून या संपूर्ण अवैध विक्रीचा भांडाफोड झाला आहे.

गुजरातस्थित या कंपनीकडे महाराष्ट्रात खत आणि कीटकनाशके विकण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही शासकीय परवानगी किंवा परवाना नव्हता. तरीदेखील आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करत व्हॉट्सॲप (WhatsApp), क्यूआर कोड (QR Code) आणि खाजगी ट्रान्सपोर्ट/कुरिअरच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट खते व कीटकनाशके विकली जात होती. कृषी विभागाला या अवैध कारभाराची गुप्त माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कारवाईचे नियोजन केले. संशय बळावल्यानंतर कृषी विभागाने एका तोतया ग्राहकाच्या माध्यमातून या कंपनीकडे १८ हजार २० रुपयांच्या विविध खत व कीटकनाशकांची ऑनलाईन ऑर्डर नोंदवली. कंपनीने रक्कम स्वीकारून ट्रान्सपोर्टद्वारे पार्सल जळगावात पाठवले. हे पार्सल ताब्यात घेतले असता त्यात ९ विविध प्रकारची उत्पादने आढळून आली. कृषी विभागाने या सर्व उत्पादनांचे नमुने तात्काळ जप्त करून पुढील रासायनिक तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

या प्रकरणी कृषी विभागाच्या बियाणे, खत व कीटकनाशक निरीक्षकांच्या फिर्यादीवरून जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्यानुसार कंपनीचे प्रतिनिधी जयेश पटेल, जबाबदार व्यक्ती विनोद एन. रानपरिया यांच्यासह इतर संबंधितांविरुद्ध खत नियंत्रण आदेश, कीटकनाशक अधिनियम, अत्यावश्यक वस्तू अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


Protected Content

Play sound