
भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या शिक्षण धोरणाला बळकटी देणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ या उपक्रमाने प्रभावित होऊन भडगाव तालुक्यातील अंचळगाव तांडा येथील शेकडो नागरिक आणि शेतकऱ्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे भडगाव तालुक्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला असून, नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी तळागाळात काँग्रेस मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

अंचळगाव तांडा येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याचे अध्यक्षस्थान काँग्रेसचे माजी जळगाव जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीपराव पवार यांनी भूषविले. युवक विधानसभा अध्यक्ष मनोहर शिवाजी महाले यांच्या संघटनात्मक प्रयत्नातून तसेच यशोदीप माळी यांच्या सहकार्याने या पक्षप्रवेशाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब प्रदीपराव पवार यांच्या हस्ते नवप्रवेशित नागरिक व शेतकऱ्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करण्यात आले. काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत शेकडो नागरिकांनी पक्षात प्रवेश केला. राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या उपक्रमातून शिक्षण, विद्यार्थी आणि युवकांच्या प्रश्नांना दिले जाणारे महत्त्व आपल्याला प्रभावित करणारे असल्याचे नवप्रवेशितांनी सांगितले. आगामी काळात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील नागरिकांच्या प्रश्नांसाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष रतीलाल महाजन, जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे सरचिटणीस याकूब खान पठाण, युवक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष गोविंद देशमुख, दिलीप शेंडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंचळगाव तांडा येथील शेकडो नागरिकांचा एकाचवेळी झालेला पक्षप्रवेश हा भडगाव तालुक्यातील काँग्रेससाठी संघटनात्मकदृष्ट्या महत्त्वाचा टप्पा असल्याचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. या प्रवेशामुळे ग्रामीण भागात पक्षाचा जनसंपर्क अधिक व्यापक होण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, आगामी काळात अंचळगाव तांडा आणि परिसरातील स्थानिक प्रश्न, शेतकरी, युवक तसेच नागरिकांच्या विविध समस्या प्रशासनासमोर मांडून त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिले. नव्या कार्यकर्त्यांच्या सहभागातून पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.



