पाचोरा, भडगावात सात दिवस जनता कर्फ्यू

पाचोरा प्रतिनिधी । कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी केलेल्या आवाहनाला सर्वपक्षीय बैठकीत मान्यता मिळाली असून यानुसार पाचोरा आणि भडगाव तालुक्यात १५ मे पासून सात दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.

आमदार किशोर पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसआयच्या प्रमुख पदाधिकारी व व्यापार्‍यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यात जनता कर्फ्यूबाबत चर्चा करण्यात आली. प्रारंभी १० मे पासून ७ दिवस जनता कर्फ्यु पाळण्याचे ठरले होते. मात्र १४ तारखेस ईद व अक्षय तृतीयाचा सण असल्याने ते ५ दिवस पुढे ढकलून अखेर १५ ते २२ मे पर्यंत शनिवार ते शनिवार असा ७ दिवस कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्यात यावा असे या बैठकीत ठरले.

पाचोरा व भडगाव तालुकावासीयांनी कडकडीत जनता कर्फ्यू पाळून आपले कुटुंब सुरक्षित ठेवण्यासाठी १५ मे ते २२ मे पर्यंत ७ दिवस सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले. मेडिकल व दवाखाने सुरु राहतील. दूध डेअरी सकाळी ७ ते ९ व सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे.

या बैठकीला आ. किशोर पाटील यांच्यासह नगराध्यक्ष संजय गोहिल, जि.प.सदस्य रावसाहेब पाटील, माजी उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, भरत खंडेलवाल, रमेश पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष अझहर खान, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश भालेराव, नंदकुमार सोनार, अ‍ॅड. अभय पाटील, सुभाष पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content