सावदा येथे कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस तात्काळ उपलब्ध करण्याची मागणी

सावदा प्रतिनिधी । येथे लसीकरणास सुरूवात झाली असून नागरिकांनी कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतला आहे. मात्र, कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस अद्यापही उपलब्ध झाला नसून तो तात्काळ उपलब्ध करण्यात यावा, अशा मागणी सावदा शिवसेना उपतालुका प्रमुख लाला चौधरी यांच्यासह माजी नगरसेवक शाम पाटील यांनी मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांना भ्रमणध्वनीद्वारे केली.

तक्रारीची दखल घेत लगेच आमदार पाटील यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी बोलणे केले असता त्यांनी येत्या सोमवारपर्यंत कोव्हॅक्सीन लस येथे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. सावदा येथे प्रथम “कोव्हॅक्सीन” घेणाऱ्या नागरिकांना प्रथम डोस घेऊन जवळपास ४० ते ५० दिवसवर झाले आहे. त्यांना आता कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस घेणे अनिवार्य झाले असताना सदर लस येथे उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची चांगलीच वणवण होत असून अनेक दुसऱ्या ठिकाणी किंवा खाजगी रुग्णालयात देखील ती उपलब्ध होत नसल्याने आता या नागरिकांना चिंता वाढली आहे. जर दुसरा डोस वेळेत मिळाला नाही तर आता पुढे काय करावे, ही देखील चिंता लागून आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात तपास केला असता वरून जी लस येईल ती आपण देतो आम्हाला कोणती लस हवी ती मागणी करता येत नाही असे समजले. त्यामुळे आता कोव्हॅक्सीनच्या दुसऱ्या डोससाठी नागरिकांना आता मात्र पर्याय मिळत नसल्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे.

कोव्हॅक्सीनच्या दुसरा डोस मिळेल या आशेने दररोज नागरिक सकाळपासून लसीकरण केंद्रावर गर्दी करतात. मात्र सदर लस उपलब्ध नसल्याचे समजताच त्यांना परत माघारी फिरावे लागते. हा प्रकार सुमारे १० ते १२  दिवसापासून सुरू आहे. याच सर्व प्रश्नाबाबत अनेक नागरिकांनी शिवसेना पदाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यावर लागलीच  शिवसेना उप तालुका प्रमुख लाला चौधरी व माजी नगरसेवक शाम पाटील यांनी तात्काळ मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनात ही बाब लक्षात आणून देताच त्यांनी लगेच जिल्हावैद्यकीय अधिकारी श्री चव्हाण यांच्याशी याबाबत फोन वरून संपर्क साधला. सदर नागरिकांची कैफियत मांडली व त्वरित येथे कोव्हॅक्सीन ही लस उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

यावेळी जिल्हावैद्यकीय अधिकारी यांनी सावदा ग्रामीण रुग्णालयात येथे येत्या सोमवारपर्यंत कोव्हेक्सीन लस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून हा दुसरा डोस उपलब्ध झाल्यास सदर नागरिकांचे कोव्हॅक्सीनेशन देखील पूर्ण होणार आहे.

Protected Content