कुर्‍हाड येथे कोरोना रूग्ण शोध मोहीम; संपूर्ण गावाची तपासणी

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील कुर्‍हाड खुर्द व कुर्‍हाड बुद्रुक येथे दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रूग्ण तपासणी मोहिम सुरू करण्यात आली आहे.

कुर्‍हा खुर्द आणि बुद्रुक या दोन्ही गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. आज पर्यंत दोघेही गावातुन जवळपास सात कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून बरेच कोरोना बाधीत ठणठणीत होऊन कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र अजूनही सक्रिय संशयित रुग्ण असल्याचे आढळून आले असल्याने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघून ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

याची दखल घेत कुर्‍हाड बुद्रुकचे माजी सरपंच किरण पाटील यांनी संपूर्ण गावातील ग्रामस्थांची टेस्ट व्हावी अशी मागणी केली होती. या अनुषंगाने माजी मंत्री आमदार गिरीष महाजन यांनी याची दखल घेत त्यांचे सहाय्यक आरोग्यदूत अरविंद देशमुख यांच्या सोबत शासकीय टीम पाठवून कुर्‍हाड बुद्रुक येथील ग्रामस्थांची व महिलांची टेस्ट करुन घेतली.

यात सत्तर लोकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ०९ लोकांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. तर दुसर्‍या दिवशी शासकीय टीमने पन्नास लोकांची टेस्ट केली होती त्यात आठ पॉझिटिव्ह निघाले होते. या सर्व पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना त्यांच्या इच्छेप्रमाणे कोविड सेंटरला पाठवण्यात आले तर काहींनी स्वतःला होम कॉरंटाईन करून घेतले. काही शेतात वास्तव्यासाठी रहायला गेल्याने तसेच गावात हायड्रोक्लोरिकची फवारणी करुन ग्रामस्थांना योग्य मार्गदर्शक सुचना करण्यात आल्या. मात्र गावात घराघरातून रॅपिड टेस्ट करण्यात येणार असल्याचे माहित पडताच एकुण ग्रामस्थांपैकी जवळपास ३५ टक्के लोकांनी गावातून पलायन करून टेस्ट करण्यासाठी विरोध दर्शविला.

यामुळे सुज्ञ नागरीकांनी नाराजी व्यक्त करत ज्यांनी रॅपिड टेस्ट केली नसेल अश्या कुटुंबातील सदस्यांना रेशनिंगचे धान्य बंद करण्यात यावे अशी मागणी केली आहे. या रॅपिड टेस्टिंग करण्यासाठी पाचोरा तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी समाधान वाघ, लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी देवेंद्र पाटील यांनी अथक परिश्रम घेतले. तर माजी सरपंच किरण पाटील, पवन पाटील, सचिन पाटील, अजय पाटील, रोशन देशमुख, शिवप्रसाद पाटील, उमेश पाटील, ग्रामसेवक विकास पाटील. यांचे विशेष सहकार्य लाभले.

Protected Content