भुसावळात चार कोविड रुग्णालयांची तपासणी

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील चार कोविड केअर सेंटरची नोडल ऑफिसर आणि त्यांच्या पथकाने अकस्मात तपासणी करून तेथील सुविधांचा आढावा घेतला.

भुसावळसह परिसरात कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने बाधीत रूग्ण संख्या वाढली आहे. यासोबत मृतांच्या संख्येतही लक्षणीय वृध्दी झालेली आहे. या अनुषंगाने शहरातील कोविड केअर सेंटरमधील सुविधांची झाडाझडती रविवारी घेण्यात आली.

शहरातील चार खासगी कोविड सेंटरची ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरच्या आरोग्य पथकाने रविवारी अचानक तपासणी केली. वैद्यकीय अधिक्षक डॉ. मयूर चौधरी, डॉ. विक्रांत सोनार, डॉ. भालचंद्र चाकोरकर आदींच्या पथकाने झाडाझडती घेऊन रुग्णांकडून माहिती जाणून घेतली आहे. याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला जाणार आहे.

भुसावळ शहरातील डॉ. राजेश मानवतकर यांचे समर्पण कोविड हॉस्पिटल, रिदम कोविड हॉस्पीटल, साईपुष्प कोविड हॉस्पीटल व मुस्कान कोविड हॉस्पिटलमध्ये रविवारी आरोग्य विभागाच्या पथकाने अचानक पाहणी केली. प्रथम डॉ. मानवतकर यांचे हॉस्पिटल गाठले. तेथे रुग्णांशी संवाद साधून उपचार, बिलांच्या संदर्भातील तक्रारींची पडताळणी केली. यासोबतच स्वच्छता, बायोमेडीकल वेस्टची स्थिती, फायर सेफ्टी ऑडीट, ऑक्सिजन बेडची मंजूर संख्या व सध्या उपलब्ध बेड आदी बाबींची पथकाने माहिती घेत घेतली. यानंतर अन्य हॉस्पीटल्समध्ये पाहणी करण्यात आली. याप्रसंगी पथकासोबत बाजारपेठ पोलिस ठाण्याचे मंगेश गोटला आणि त्यांचे सहकारी देखील उपस्थित होते.

कोविड सेंटरमध्ये २४ तास डॉक्टर, नर्सिंग स्टाफ उपलब्ध आहे किंवा नाही? याची माहितीही घेण्यात आली. कोविड सेंटरमधील माहिती व आढळलेल्या त्रुटी आदींचा सविस्तर अहवाल जिल्हा प्रशानाकडे पाठवला जाणार आहे. रुग्णांची वाढीव बिले व इतर तक्रारींवरही प्रशासनाची नजर राहणार असल्याची माहिती डॉ. मयूर चौधरी यांनी दिली आहे.

Protected Content