बस चालकाची वरिष्ठ लिपीकास मारहाण तर आगार प्रमुखांना शिवीगाळ; गुन्हा दाखल

पाचोरा, प्रतिनिधी | त्रयस्थ कर्मचार्‍यांच्या गोपनीय प्रकरणांची माहिती मागून ती न दिल्याने येथील एस.टी. महामंडळाच्या एका चालकाने वरिष्ठ लिपीकाला मारहाण करून आगार प्रमुखास शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना आज घडली. या प्रकरणी चालकाच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा आगारातील चालक प्रदीप अंकुश पाटील( रा. पाचोरा) हे ्रेज दि. २७ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आगारात आले. त्यांनी वरिष्ठ लिपिक रविंद्र पाटील यांचेकडे त्रयस्थ कर्मचार्‍यांचे समरी व अपराध प्रकरणांचा गोपनिय अहवाल दाखला अशी मागणी केली. यावर रविंद्र पाटील यांनी सांगितले की, त्रयस्थ कर्मचार्‍यांचे गोपनिय अहवाल आगार प्रमुखांच्या परवानगी विना देता येत नाही. तुम्हाला त्रयस्थ कर्मचार्‍यांचे गोपनिय अहवाल पाहिजे असल्यास तुम्ही आगार प्रमुखांकडे मागणी करावी असे सांगितल्याचा राग आल्याने प्रदीप पाटील यांनी आगार प्रमुख निलीमा बागुल यांना शिवीगाळ करत वरिष्ठ लिपिक रविंद्र पाटील यांचे हातात असलेला अहवाल हिसकावण्याचा प्रयत्न करून रविंद्र पाटील यांना खाली पाडुन लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. या प्रकाराने आगाराच्या परिसरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, याप्रसंगी सहाय्यक वाहतुक अधिक्षक सागर फिरके, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक योगेश जाधव व वाहतूक नियंत्रक बाळासाहेब शेळके हे त्यांना समजविण्यासाठी गेले असता प्रदीप पाटील यांनी त्यांना देखील धक्काबुक्की केली. दरम्यान आगार प्रमुख निलीमा बागुल यांची याचवेळी जळगांव येथे कार्यालयीन बैठक असल्याने त्या तेेथे होत्या. घटनेबाबत निलीमा बागुल यांना माहीती दिल्यानंतर त्या तात्काळ घटनास्थळी हजर झाल्यानंतर प्रदिप पाटील यांनी आगार प्रमुखांना शिवीगाळ करुन घटनास्थळावरुन पळ काढला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात प्रदिप पाटील यांचे विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक किशोर पाटील हे करत आहे.

आज घडलेला प्रकार हा धक्कादायक असून दोषी चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी केली आहे.

Protected Content