भावी मंत्री किशोरआप्पा पाटील ! : वाढदिवसाला अपेक्षांचे शक्ती प्रदर्शन !

पाचोरा-नंदू शेलकर Special Report | पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बहुतांश फलकांवर भावी मंत्री असा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात हा एक चर्चेचा विषय बनला आहे.

राज्य मंत्रीमंडळाचा रखडलेला विस्तार येत्या काही दिवसांमध्ये होणार असल्याचे संकेत आता मिळाले आहेत. यामुळे मंत्रीपदासाठी फिल्डींग लाऊन असलेल्या आमदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. यात जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता शिंदे गटाचे ज्येष्ठ आमदार चिमणराव पाटील, पाचोरा-भडगावचे आमदार किशोरआप्पा पाटील तसेच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यापैकी एकाला मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यातच आज किशोरआप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या बहुतांश शुभेच्छा फलकांवर भावी मंत्री असा स्पष्ट उल्लेख केलेला असल्याने त्यांच्या समर्थकांना आता मंत्रीपदाची मोठी आस लागल्याचे दिसून येत आहे.

खुद्द आमदार किशोरआप्पा पाटील यांनी कालच पत्रकारांशी बोलतांना मंत्रीपदाबाबतही सूचक वक्तव्य केले होते. यात संधी मिळाल्यास उत्तमच असे त्यांनी नमूद केले होते. यामुळे आता मंत्रीमंडळाच्या आगामी विस्तारात आप्पांना नक्की संधी मिळेल अशी आस त्यांच्या समर्थकांना लागल्याचे दिसून येत आहे. अर्थात, ही अपेक्षा पूर्ण होणार की नाही ? याचे उत्तर येणारा काळच देणार आहे. तथापि, शुभेच्छा फलकांवरील भावी मंत्री असा उल्लेख हा परिसरात एकच चर्चेचा विषय बनलाय हे नाकारता येणार नाही !!

Protected Content