
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचालित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (GIMR), जळगाव आणि महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने व्यवस्थापन शिक्षणातील आधुनिक अध्यापन पद्धतींवर आधारित तीन दिवसीय राष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. “इनोव्हेटिव्ह मॅनेजमेंट टीचिंग स्ट्रॅटेजीज फॉर जेन झेड स्टुडंट्स” या विषयावरील या कार्यशाळेला देशभरातील प्राध्यापक आणि संशोधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

झूम (Zoom) ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेचा मुख्य उद्देश व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकांना पारंपरिक अध्यापन पद्धतींपासून पुढे जात डिजिटल युगातील ‘जेन झेड’ विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाधारित, संवादात्मक आणि प्रात्यक्षिकांवर आधारित अध्यापन पद्धतींचे प्रशिक्षण देणे हा होता. या राष्ट्रीय कार्यशाळेत देशभरातील १३० हून अधिक प्राध्यापक आणि संशोधकांनी सहभाग नोंदवला. कार्यशाळेच्या तीनही दिवसांमध्ये विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांनी सखोल मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी प्रा. सुहास जातेगावकर यांनी भविष्यातील कॉर्पोरेट क्षेत्रातील आव्हानांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या आधुनिक व्यवस्थापन शिक्षण पद्धतींवर विचार मांडले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर आणि उद्योगाच्या बदलत्या गरजांनुसार शिक्षणामध्ये होणाऱ्या बदलांवर भर दिला. दुसऱ्या दिवशी डॉ. चारुलता कुलकर्णी यांनी ‘जेन झेड’ विद्यार्थ्यांची बदलती मानसिकता, त्यांचे वर्गातील लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी वापरता येणाऱ्या प्रभावी पद्धती तसेच डिजिटल साधनांचा सकारात्मक आणि परिणामकारक वापर याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास अध्यापन अधिक प्रभावी आणि विद्यार्थी-केंद्रित कसे होऊ शकते, हे स्पष्ट केले.
कार्यशाळेच्या अंतिम दिवशी डॉ. अर्पिता सिंग यांनी व्यवस्थापन शिक्षणामध्ये औद्योगिक मानसशास्त्र आणि आधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानाची भूमिका यावर मार्गदर्शन केले. त्यांनी विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शिक्षकांना नवीन अध्यापन तंत्रांचा वापर कसा करता येईल याची माहिती दिली. गोदावरी आय.एम.आर.चे संचालक डॉ. प्रशांत एस. वारके यांच्या मार्गदर्शनाखाली या मोफत राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या समारोप सत्रात आयक्यूएसी (IQAC) समन्वयक डॉ. चेतन सरोदे यांनी सर्व प्रमुख वक्ते, मार्गदर्शक तसेच कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या समन्वयक प्रा. स्मिता चौधरी आणि प्रा. पूनम भारुडे यांचे आभार व्यक्त केले. या कार्यशाळेमुळे सहभागी प्राध्यापकांना डिजिटल युगातील विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेण्यासाठी, आधुनिक अध्यापन तंत्र आत्मसात करण्यासाठी आणि व्यवस्थापन शिक्षण अधिक प्रभावी बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले. गोदावरी आय.एम.आर. महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे उच्च शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींना प्रोत्साहन मिळाले आहे.



