Home Cities अमळनेर अमळनेरच्या वामन नगरमध्ये अपुरा पाणीपुरवठा ; महिलांचा नगरपालिकेत धडक मोर्चा 

अमळनेरच्या वामन नगरमध्ये अपुरा पाणीपुरवठा ; महिलांचा नगरपालिकेत धडक मोर्चा 

0
42


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील पिंपळे रोड परिसरातील वामन नगर भागात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. पाणी समस्या तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी वामन नगरमधील महिलांनी आज दि. १५ रोजी अमळनेर नगरपालिकेत जाऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

वामन नगर परिसरात नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दि. १२ रोजी करण्यात आलेल्या पाणीपुरवठ्यात नागरिकांना केवळ अर्धा तास पाणी मिळाल्याचे महिलांनी सांगितले. यापूर्वीही १२ मार्च २०२६ रोजी अशाच प्रकारे कमी वेळ पाणीपुरवठा झाल्याची बाब नागरिकांनी व्हॉलमन, नगरसेवक, पाणीपुरवठा सभापती तसेच मुख्याधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली होती. पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत नागरिकांनी वेळोवेळी संबंधित प्रशासनाशी संपर्क साधून तक्रारी केल्या, मात्र अद्यापही अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पिंपळे रोडच्या मुख्य पाईपलाईनला जोडणी करण्यात यावी किंवा नवीन व्हॉल्व्ह बसवण्यात यावा, अशी मागणी त्यांनी नगरपालिकेकडे केली आहे.

महिलांचे शिष्टमंडळ नगरपालिकेत गेले असता मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि पाणीपुरवठा सभापती यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांनी पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना निवेदन देत नागरिकांची समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली. यावेळी महिलांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, येत्या आठ दिवसांत वामन नगर भागातील पाणीपुरवठा सुरळीत आणि पुरेशा प्रमाणात सुरू न झाल्यास यापुढे मोठे आंदोलन करण्यात येईल. पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून त्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound