Home Cities अमळनेर अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिलासा ; आ. अनिल पाटील यांची महावितरणला सूचना

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिलासा ; आ. अनिल पाटील यांची महावितरणला सूचना

0
45


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या हिताला प्राधान्य देण्याच्या सूचना अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शेती पंपांसाठी नियमित आणि खंडमुक्त वीजपुरवठा मिळावा यासाठी आमदारांनी महावितरण अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेऊन विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.

पेरणी, रोप लागवड आणि पिकांना पाणी देण्याच्या महत्त्वाच्या काळात शेती पंपांना पुरेसा वीजपुरवठा मिळणे आवश्यक आहे. मात्र वारंवार होणारे वीज खंडित होणे, कमी दाबाचा वीजपुरवठा आणि तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन आ. अनिल पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांकडे प्राधान्याने लक्ष देण्याच्या सूचना केल्या.

बैठकीत आमदारांनी शेती पंपांना प्राधान्याने वीजपुरवठा देण्याची मागणी केली. रोस्टिंग किंवा लोडशेडिंगचा फटका शेती पंपांना बसू नये यासाठी स्वतंत्र फीडरद्वारे अथवा निश्चित वेळापत्रकानुसार किमान ८ तास दर्जेदार वीज उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.

याशिवाय २२० केव्ही आणि ३३ केव्ही उपकेंद्रांवरील तांत्रिक दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करून वारंवार होणारे ट्रिपिंग आणि वीज खंडित होण्याचे प्रमाण कमी करण्याच्या सूचना महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच शेतकऱ्यांच्या वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाचा पुरवठा अशा तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करण्यावर भर देण्यात आला.

यावेळी आमदार अनिल पाटील म्हणाले की, “शेतकरी हा देशाचा कणा आहे. पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना विजेची सर्वाधिक गरज असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन त्यांना नियमित आणि गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा मिळण्यासाठी महावितरणने कार्यवाही करावी.” आमदारांच्या सूचनांची महावितरण अधिकाऱ्यांनी नोंद घेत असून लवकरात लवकर आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीमुळे अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांना शेती पंपांसाठी सुरळीत वीजपुरवठा मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.


Protected Content

Play sound