Home Cities अमळनेर मांडळ गावाला पुराचा धोका ; संरक्षण भिंतीसाठी ३ कोटींच्या निधीची मागणी, डॉ....

मांडळ गावाला पुराचा धोका ; संरक्षण भिंतीसाठी ३ कोटींच्या निधीची मागणी, डॉ. दीपक पाटील यांचे गिरीश महाजनांना निवेदन

0
81


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मांडळ गावाला पांझरा नदीच्या पुरामुळे वारंवार निर्माण होणाऱ्या धोक्यापासून कायमस्वरूपी संरक्षण मिळावे, यासाठी नदीकाठावर पूर संरक्षण भिंत उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी आपत्ती व्यवस्थापन निधीतून अंदाजे ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात यावा, अशी मागणी माजी पंचायत समिती सभापती तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य डॉ. दीपक पंढरीनाथ पाटील यांनी कॅबिनेट मंत्री तथा जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात डॉ. दीपक पाटील यांनी निवेदन सादर केले असून, मांडळ ग्रामपंचायतीच्या वतीनेही पूर संरक्षण भिंतीच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. मांडळ गावाची लोकसंख्या अंदाजे १२ ते १५ हजार असून, हे गाव पांझरा नदीच्या काठावर वसलेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात नदीला पूर आल्यास पुराचे पाणी गावात शिरण्याचा धोका कायम असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पांझरा नदीला पूर आल्यानंतर नदीचे पाणी गावातील वस्तीत शिरत असल्याने नागरिकांच्या घरांसह सार्वजनिक मालमत्तेलाही धोका निर्माण होतो. विशेष म्हणजे पुराचे पाणी गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींमध्ये शिरत असल्याने पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होतो. त्यामुळे भविष्यातील संभाव्य पूरस्थितीचा विचार करून नदीकाठावर कायमस्वरूपी संरक्षणात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे डॉ. पाटील यांनी म्हटले आहे.

निवेदनात मांडळ गावाच्या नदीकाठच्या भागात अंदाजे १०० ते ६०० मीटर लांबीची पूर संरक्षण भिंत उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. या संरक्षण भिंतीलगत फेवर ब्लॉक बसविण्याचे कामही करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या संपूर्ण कामासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून अंदाजे ३ कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मागील काळात अतिवृष्टी आणि पुराच्या घटनांमुळे नदीकाठच्या गावांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. हवामानातील बदल आणि अचानक होणाऱ्या अतिवृष्टीच्या घटना लक्षात घेता भविष्यात पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपत्ती घडल्यानंतर मदत करण्यापेक्षा त्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांकडूनही सांगण्यात येत आहे. मांडळ गावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संरक्षण भिंतीचे काम झाल्यास पुराचे पाणी गावात शिरण्याचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण होऊन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही ही उपाययोजना महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी प्रस्तावाची तातडीने दखल घेऊन तांत्रिक पाहणी करावी आणि निधी मंजुरीची प्रक्रिया सुरू करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आपत्ती व्यवस्थापन निधीतून मांडळ गावासाठी पूर संरक्षण भिंतीच्या कामास मंजुरी देऊन आवश्यक ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी कळकळीची विनंती डॉ. दीपक पंढरीनाथ पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. या मागणीमुळे पांझरा नदीकाठच्या मांडळ गावाच्या पूरसंरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, शासनाच्या निर्णयाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound