Home क्राईम नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई; ३.४५८ किलो गांजासह दोघे जेरबंद

नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई; ३.४५८ किलो गांजासह दोघे जेरबंद

0
8


नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अमली पदार्थांच्या अवैध विक्री व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत नशिराबाद पोलिसांनी मोठी कारवाई केली. साती बाजार चौक परिसरात सापळा रचून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ किलो ४५८ ग्रॅम गांजासह एकूण २ लाख ६५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि सेवन रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने नशिराबाद पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी योगिता नागरे यांनी अधिकारी व अंमलदारांना अमली पदार्थांबाबत गोपनीय माहिती संकलित करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नशिराबाद येथील साती बाजार चौकात दोन इसम अमली पदार्थ विक्रीच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता गांजा आढळून आला.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राजेश भारत बाडगे (वय ३२, रा. महादेव मंदिराजवळ, तांबापुरा, जळगाव) आणि सुभाष सीमा मराठे (वय ६८, रा. सातोदीनगर, नशिराबाद, जळगाव) अशी आहेत.

२ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी केलेल्या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला—

– ३ किलो ४५८ ग्रॅम गांजा – अंदाजे १ लाख ८० हजार रुपये
– २४० ग्रॅम गांजा – अंदाजे १२ हजार ४०० रुपये
– होंडा शाईन मोटारसायकल (MH-19-CD-9574) – अंदाजे ६० हजार रुपये
– ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन – अंदाजे १० हजार रुपये
– भारत कंपनीचा मोबाईल फोन – अंदाजे २ हजार रुपये

अशाप्रकारे पोलिसांनी एकूण २ लाख ६५ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात अमली पदार्थांची अवैध विक्री, वाहतूक आणि सेवन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी अमली पदार्थांशी संबंधित कोणतीही माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.


Protected Content

Play sound