Home Uncategorized सावकारी परवान्यासाठी लाच : सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांसह खासगी इसमावर गुन्हा दाखल

सावकारी परवान्यासाठी लाच : सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांसह खासगी इसमावर गुन्हा दाखल

0
5


भुसावळ-लाईव्ह ट्र्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खासगी सावकारीचा परवाना काढून देण्यासाठी वीस हजार रूपयांची लाच मागितल्याचा प्रकार भुसावळात घडला असून या प्रकरणी सहकार खात्याच्या दोन अधिकाऱ्यांसह खासगी लेखापरीक्षक असणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने भुसावळात धडक कारवाई केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यातील तक्रारदार हे भुसावळ शहरातील रहिवासी असून त्यांना सावकारी व्यवसायाचा परवाना हवा होता. यासाठी त्यांनी सहायक निबंधक कार्यालयात अर्ज दिला होता. याप्रसंगी सहकार अधिकारी विजय विनायकराव गरूड यांनी फिर्यादीला आपले सहकारी तथा प्रमाणीत लेखा परीक्षक सुरेश जनार्दन विसपुते यांना भेटण्यास सांगितले होते. त्याने तक्रारदाराला त्याच्यासह हेमंत काळे या खासगी इसमासह स्वत:साठी दहा हजार आणि साहेबांसाठी २० हजार अशा एकूण तीस हजार रूपयांची लाच मागितली.

दरम्यान, संबंधीत व्यक्तीने या संदर्भात जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. या खात्याच्या वतीने स्वतंत्र पथक तयार करून सापळा रचण्यात आला. या पथकाच्या समोरच सुरेश विसपुते यांनी तक्रारदाराकडून तीस हजार रूपये स्वीकारून यातील पाच रूपये हे गरूड यांना फोन पे द्वारे पाठविले. हे होताच एसीबीच्या पथकाने त्यांच्या मुसक्या आवळल्या.

या प्रकरणी भुसावळच्या बाजारपेठ पोलीस स्थानकात विजय विनायकराव गरूड सहकार अधिकारी (रा. धुळे ); सुरेश जनार्दन विसपुते प्रमाणित लेखा परीक्षक (रा. माऊलीनगर, भुसावळ) आणि खासगी लेखा परीक्षक हेमंत प्रकाश काळे ( रा. विवेकानंद नगर, जळगाव) या तिघांच्या विरोधात बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात या दोघांना अटक करण्यात आली असून सहकार अधिकारी विजय गरूड हा मात्र पसार झाला असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

ही धडाकेबाज कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अधिकारी हेमंत नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली रेश्मा अवतारे, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील व किशोर महाजन यांच्या पथकाने केली.


Protected Content

Play sound