जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने दि. ५, ६, ७, जानेवारी २०२४ रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. महोत्सवाची सुरूवात झीटीवी वरील सा रे ग म प लिटिल चॅम्पसचे बालकलाकार गायिका ज्ञानेश्वरी घाडगे हिच्या गायनाने होणार आहे. व्दितीय सत्रात लखनऊ घराण्याचे पंडित अर्जून मिश्रा यांचे चिरंजीव व स्नूषा अनुज मिश्रा व नेहा मिश्रा यांचा कथक जुगलबंदी सादर होईल.
व्दितीय दिनाच्या प्रथम सत्रात मुंबईच्या प्रतिभासंपन्न गायिका रौंकिणी गुप्ता या गायन सादर करतील. व्दितीय सत्रात सोनी टीव्हीवरील इंडिया गॉट टॅलेटच्या १० मधील रागा फ्युजन बँडचे सादरीकरण होणार आहे. तृतीय सत्रात प्रथम सत्र हे सहगायनाने होणार असून पं. राजन साजन मिश्रा यांची पुढची पिढी अर्थात पं. रितेश व पं. रजनीश मिश्रा यांच्या युगल गायनाने संपन्न होईल. समारोपाच्या सत्रात पं. आदित्य ओक, निनाद मुळावकर व विशाल धुमाळ च्या जुगलबंदीने २२ व्या बालगंधर्व महोत्सवाची सांगता येईल.
तरूण पिढीने ऐकावा व जुन्या पिढीने सुध्दा ऐकावा असा स्वरोत्सव असून या तीनही दिवसांचे सूत्रसंचालन मुंबईच्या सुसंवादिनी दीप्ती भागवत करणार आहेत. तमाम जळगावकरांनी मोठया संख्येने उपस्थिती देऊन या बालगंधर्व संगीत महोत्सवाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व विविध आयोजकांनी केले आहे.