उधारीच्या पैशांवरून तरूणाला मारहाण करणाऱ्याला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रामेश्वर कॉलनी परिसरात राहणाऱ्या तरुणाला उधारीच्या पैशांवरून लाकडी दांडक्याने मारहाण करणाऱ्या संशयताला बुधवारी ६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता रामेश्वर कॉलनीतून अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता कारागृहात रवानगी केली आहे.  योगेश उर्फ कर्कटक भागवत जाधव रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, सागर सुरेश कोळी (वय-३२) रा.सुनंदा किराणा दुकानासमोर, रामेश्वर कॉलनी, जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून मिस्तरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो. २९ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता सागर कोळी हा त्याच परिसरातील आदित्य चौकात बसलेला होता. त्यावेळी कर्कटक उर्फ योगेश जाधव व त्याच्यासोबत एक जण त्या ठिकाणी आले. त्यावेळी सागर कोळी याने योगेश जाधवकडे उधारीने दिलेल्या पैसे मागितले. याचा राग आल्याने बाजूला पडलेला लाकडी दांडा हातात घेऊन योगेश जाधवने सागर कोळी याला बेदम मारहाण केली. तसेच त्याला जीवेठार मारण्याची धमकी दिली.

या मारहाणीमध्ये सागर हा गंभीर जखमी झाला, त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अखेर त्याच्या जबाबदावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संशयित आरोपी कर्कटक उर्फ योगेश भागवत जाधव याला रामेश्वर कॉलनीतून बुधवारी ६ डिसेंबर रोजी अटक केली. त्याला गुरुवारी ७ डिसेंबर रोजी जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली आहे. दरम्यान ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद सरवदे, पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, पंकज पाटील, ललित नारखेडे, छगन तायडे यांनी केली आहे.

Protected Content