इंधनाच्या पाठोपाठ कांद्याचे दर कमी होणार !

नवी दिल्ली वृत्तसंस्था | पेट्रोल आणि डिझेलच्या पाठोपाठ केंद्र सरकारने कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून यामुळे कांद्याचे दर देखील कमी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काल अखेर मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेत उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पेट्रोल ५, तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर राज्यांनी व्हॅटचे दर कमी केल्यास यात अजून कपात होऊ शकते. दरम्यान, इंधन आघाडीवर दिलासा दिल्यानंतर आता मोदी सरकारनं कांद्यांचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे.

कांद्याचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं देशभरात असलेल्या बाजारांमधील आपला बफर स्टॉक कमी केला आहे. त्यामुळे १.११ लाख टन कांदा आता बाजारात आला आहे. बाजारात कांद्याची आवक वाढल्यानं किलोमागे ५ ते १२ रुपयांचा दिलासा मिळाला आहे. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत कांदा स्वस्त झाला आहे. कांद्याचा सध्याचा किरकोळ बाजारातील दर सरासरी ४०.१३ रुपये असून होलसेल बाजारात हाच दर ३१.१५ रुपये इतका आहे, अशी आकडेवारी मंत्रालयानं दिली.

मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबरपर्यंत बफर स्टॉकमधील १,११,३७६.१७ टन कांदा प्रमुख बाजारांमध्ये आणला गेला. त्यामुळे कांद्याच्या दरात किलोमागे ५ ते १२ रुपयांची घसरण झाली. उदा. मुंबईत १४ ऑक्टोबरला कांद्याचा दर ५० रुपये किलो होता. तो आता ४५ रुपयांवर आला आहे. तर येत्या काही दिवसांमध्ये हे दर अजून कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे इंधनाच्या दरांच्या पाठोपाठ आता कांद्याचे दर देखील कमी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content