पुण्यात भीषण अपघात; ट्रकने कारला दीड किलोमीटर फरफटत नेलं

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा |  मुंबई-बंगळुरू महामार्गावर  भूमकर पुलावर शनिवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पाच गाड्यांना ट्रकने धडक देत यातील एका कारला दीड किलो मीटर फरपटत नेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या अपघातात चार जण जखमी असून त्यांना जवळील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ट्रकने एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला धडक देऊन पुढे क्रश भरून चाललेल्या टिप्परला धडक दिली. या अपघातात एक पिकअप व एका कारला उजव्या बाजूने जोरदार धडक बसली. हा अपघात झाला त्यानंतर ट्रक चालकाने बाजूने जात असलेल्या एका कारला ट्रकच्या समोरील बाजूने धडक देऊन कारला जवळपास दीड किलोमीटर फरफटत नेले.

घटनास्थळी सिंहगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, सिंहगड वाहतूक पोलिस तसेच भारती विद्यापीठ वाहतूक पोलिस, राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंगचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. अपघात झालेली वाहने बाजूला घेण्याचे काम सुरू आहे.

Protected Content