ओंकारेश्वर ते पंढरपूर सायकलवारीचे रावेरात उत्सवात स्वागत


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । श्री क्षेत्र ओंकारेश्वर ते पंढरपूर सायकलवारी आज रावेर शहरातून मोठ्या उत्साहात रवाना झाली. पंधरा सायकल व्रतधारी वारकरी आपल्या श्रद्धेचा व संकल्पाचा एक भाग म्हणून आठ दिवसांचा खडतर प्रवास करत पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी दाखल होणार आहेत. रावेर शहरात या सायकलवारीचे मोठ्या उत्सवात स्वागत झाले आणि वारकऱ्यांच्या मनोबलाला उभारी मिळाली.

या सायकलवारीत दशरथ भोई, आनंदा भोई, गोविंदा भोई, कडुबा भोई, कैलास भाई, गणेश महाजन, सुनील महाजन, शिवलाल शिंदे, अनिल जंजाळकर, मगन भोई, दुर्गेश जंजाळकर, बाबूलाल भोई, विजय भोई, संदीप भोई आणि रतन भोई या पंधरा जणांचा समावेश आहे. सर्वांनी सकाळी रावेर येथून आपली सायकलवारी सुरू केली. ही यात्रा आठ मुक्कामांनंतर नवव्या दिवशी पंढरपूरमध्ये पोहचणार आहे, जिथे लाखो भक्त विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी एकवटले असतात.

सायकलवारीच्या आयोजनात सुनील चौधरी, संजय भोई, गोपाळ भोई आणि इतर सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी नियोजन, मुक्काम व्यवस्थापन आणि सुरक्षा यामध्ये मोलाचे योगदान दिले. शहरातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि संस्थांनी या वारीचे स्वागत केले. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी, फराळ, तसेच पुष्पवृष्टी करण्यात आली. या स्वागतामुळे वारकऱ्यांचे मनोबल उंचावले असून, संपूर्ण प्रवासात त्यांना प्रेरणा मिळाली आहे.

सायकलवारीच्या मार्गावर भाविकांची श्रद्धा आणि सामाजिक सलोखा यांचा संगम पहायला मिळतो आहे. ही यात्रा एक धार्मिक तसेच सामाजिक उपक्रम बनली असून, वारकरी संप्रदायातील युवावर्गाचा सक्रिय सहभाग विशेषत्वाने लक्षवेधी ठरतो आहे. यातून पर्यावरण संरक्षण, आरोग्य आणि भक्ती यांचा एकत्रित संदेशही दिला जातो.