विषारी औषध घेतल्याने वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू !


अमळनेर लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील ६७ वर्षीय वृध्दाने शेतात विषारी औषध सेवन केल्याने उपचारादरम्यान अमळनेर ग्रामीण रूग्णालयात मृत्यू झाल्याची घटना रविवारी २२ जून रोजी सायंकाळी ६ वाजता समोर आले आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विनोद रामराव शिसोदे वय ६७ रा. डांगरी ता. अमळनेर असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.

विनोद शिसोदे हे आपल्या कुटुंबियांसह अमळनेर तालुक्यातील डांगरी येथे वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. रविवारी २२ जून रोजी दुपारी ३ वाजता ते घरात कुणाला काहीही न सांगता शेताकडे निघून गेले. दरम्यान मारवड रस्त्यावरील एका शेतात ते बेशुध्दावस्थेत आढळून आले. त्यांच्याजवळ विषारी औषधची बाटली मिळून आली. हा प्रकार नातेवाईक आणि गावातील ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांना तातडीने अमळनेर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर मयत घोषीत केले. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ सुनील आगोणे हे करीत आहे.