घरकुलासाठी लाच घेणारे ग्रामसेवक, रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात!


भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरकुल योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लाच मागणाऱ्या एका ग्रामसेवक आणि रोजगार सेवकाला रंगेहात पकडल्याची कारवाई जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने केली आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

अशी आहे घटना !
तक्रारदार हे भडगाव तालुक्यातील मांडकी गावातील रहिवाशी आहेत. तक्रारदाराच्या मंजूर असलेल्या घरकुलाचा दुसरा हप्ता मिळावा आणि गट नंबर नमुना आठ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी ग्रामसेवक सोनिराम धनराज शिरसाठ (वय ४७, रा. पाचोरा, जि. जळगाव) आणि रोजगार सेवक जितेंद्र लक्ष्मण चौधरी (वय ३८, रा. पाचोरा, जि. जळगाव) यांनी ६ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी याबाबत जळगाव येथील लाचलुचपत विभागाकडे धाव घेवून तक्रार दिली होती.

५००० रुपयांची लाच घेतांना रंगेहात अटक
एसीबीच्या पथकाने तक्रारीची सत्यता पडताळली. २३ जून रोजीच सापळा रचण्यात आला. आरोपींनी सुरुवातीला ६ हजार रुपयांची मागणी केली असली तरी, तडजोडीअंती ५ हजार रुपये घेण्याचे निश्चित झाले. पंचांसमक्ष ग्रामसेवक सोनिराम शिरसाठ आणि रोजगार सेवक जितेंद्र चौधरी यांनी तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

लाच स्वीकारल्याची रक्कम ५ हजार रुपये हस्तगत करण्यात आली असून, दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.