जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानकातून एक धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे. २१ जून रोजी सुटी असल्यामुळे जामनेर येथील मूळगावी जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना आरोग्य सेविका ज्योती प्रमोद वाघ (वय ४७, रा. खोटे नगर, मूळ रा. जामनेर) यांची ७० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरट्याने लंपास केली आहे. या प्रकरणी २३ जून रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय घडली?
ज्योती वाघ या जिल्हा परिषदेत आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहेत. २१ जून रोजी त्या सुटीनिमित्त आपल्या मूळगावी जामनेरला जाण्यासाठी नवीन बसस्थानकातून बसमध्ये चढत होत्या. बसमध्ये गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १३.२० ग्रॅम वजनाची आणि अंदाजे ७० हजार रुपये किमतीची सोनपोत चोरून नेली. ही घटना बसमध्ये चढत असतानाच घडल्याचे सांगण्यात येत आहे.
घरी पोहोचल्यावर चोरी लक्षात आली
ज्योती वाघ जामनेर येथील घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, आपल्या गळ्यातील सोनपोत चोरीला गेली आहे. या प्रकाराने त्यांना मोठा धक्का बसला. लागलीच, सोमवारी (२३ जून) त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात या चोरीसंदर्भात फिर्याद दिली. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.