ओंकार भोजनेची ‘हास्यजत्रा’मध्ये पुनरागमन; वनिता खरातची खास पोस्ट व्हायरल


मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। मराठी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवलेल्या आणि प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी शोमध्ये एक खास चेहरे पुन्हा दिसणार आहे. अभिनय, विनोद आणि टायमिंगच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केलेला अभिनेता ओंकार भोजने पुन्हा एकदा या मंचावर परतला असून, त्याच्या पुनरागमनाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अभिनेत्री वनिता खरातने केलेली सोशल मिडिया पोस्ट याला अजूनच गोडीदार वळण देत आहे.

काही काळापूर्वी ओंकार भोजनेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून ब्रेक घेतला होता. त्याने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी विविध माध्यमांमध्ये वेगळी वाट धरली होती. मात्र, आता पुन्हा एकदा तो हास्यजत्रेच्या मंचावर अवतरणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. त्याचा पहिला प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

ओंकारच्या या एन्ट्रीवर अभिनेत्री वनिता खरातने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. सेटवरील ओंकारसोबतचा एक फोटो पोस्ट करत तिने लिहिलंय, “मामा-मामी is back… हा इथं काय करतोय?… बघायला विसरू नका! तुमच्या टेन्शन वरची मात्रा – महाराष्ट्राची हास्यजत्रा!” तिच्या या पोस्टने सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. वनिताचे आणि ओंकारचे स्केचेस याआधीही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले होते. त्यामुळे दोघे पुन्हा एकत्र पाहायला मिळणार, ही चाहत्यांसाठी पर्वणीच आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने गेल्या काही वर्षांत अनेक नवोदित कलाकारांना व्यासपीठ दिलं आहे. ओंकार भोजने याच मंचावरून घराघरात पोहोचला. त्याच्या विनोदी अंगाने आणि सहज अभिनयाने तो लवकरच मराठी मनोरंजन विश्वात एक आपलं स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे त्याचं पुन्हा शोमध्ये येणं हे एक प्रकारे ‘कमबॅक’ मानलं जात आहे, आणि त्याच्या चाहत्यांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे.