नक्षलग्रस्त गडचिरोलीत आता ड्रोनद्वारे पोस्टाची डिलिव्हरी 


गडचिरोली – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा।  जेथे जाण्यास लोक घाबरतात, अशा नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागात आता पोस्टाची सेवा हवेतून पोहोचणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम २७ गावांमध्ये ड्रोनद्वारे पोस्ट, औषधे आणि आवश्यक वस्तूंची तात्काळ डिलिव्हरी करण्यासाठी ‘इंडिया पोस्ट’ने नवी योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. ‘D+0 डिलिव्हरी’ अर्थात “त्याच दिवशी वितरण” हे योजनेचे लक्ष्य असून, त्यामुळे या भागातील जनजीवनात सकारात्मक बदल होणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, वैरागड आणि सिरोंचा या नक्षलग्रस्त तालुक्यांतील अनेक गावांमध्ये आतापर्यंत साध्या पोस्ट सेवा पोहोचवणेही मोठे आव्हान होते. घनदाट जंगले, खराब रस्ते आणि सततचा नक्षलवाद्यांचा धोका यामुळे या गावांमध्ये पत्र, पार्सल, औषधे किंवा सरकारी कागदपत्र पोहोचवण्यास दोन ते तीन दिवस लागू शकत होते. मात्र, आता ‘इंडिया पोस्ट’ने ड्रोनचा वापर करत ही अडचण दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेमुळे केवळ वेळेची बचत होणार नाही, तर सरकारी योजनेचा फायदा प्रत्यक्ष गावकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवता येणार आहे.

या योजनेअंतर्गत २७ गावांची निवड करण्यात आली असून, लवकरच येथे ड्रोनद्वारे पोस्ट डिलिव्हरी सुरु होणार आहे. यासंदर्भात माहिती देताना अधिकारी ललित बोरकर यांनी सांगितले की, आता या गावांमध्ये मेडिकल किट, सरकारी कागदपत्र, वर्तमानपत्रे आणि इतर आवश्यक वस्तू देखील सहजतेने पोहोचवता येणार आहेत. यामुळे संचाराची व्याप्ती वाढणार असून, याचा थेट परिणाम या भागातील जीवनाच्या गतीवर होणार आहे.

या उपक्रमाला मूळ चालना मे २०२५ मध्ये मिळाली होती, जेव्हा कर्जत ते माथेरान या दरम्यान ९ किलो वजनाचे पार्सल फक्त २० मिनिटांत ड्रोनद्वारे पोहोचवण्यात आले. या दरम्यान रस्त्याने प्रवास करण्यास तब्बल दोन तास लागतात, त्यामुळे ही सेवा किती उपयुक्त ठरू शकते, हे स्पष्ट झाले. याच यशस्वी ट्रायलनंतर ऑगस्टमध्ये चंद्रपूर पोस्ट विभागाने गडचिरोलीसाठी प्रस्ताव सादर केला आणि केंद्र सरकारने याला मंजुरी दिली.

या सेवेमुळे पावसाळ्यात अनेकदा तुटून जाणाऱ्या संपर्क व्यवस्थेवर मात करता येणार आहे. अशा वेळीही औषधे, अन्नपदार्थ किंवा इतर तातडीच्या वस्तू ड्रोनच्या सहाय्याने पोहोचवता येणार आहेत. नक्षलप्रभावीत गावांपर्यंत सरकारी सेवा पोहोचवण्यासाठी ही योजना ‘गेम चेंजर’ ठरण्याची शक्यता आहे. तसेच, ही सेवा पुढील काळात इतर दुर्गम भागातही राबवली जाणार असल्याचे संकेत आहेत.