भाजपची बिहार निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर


पटना – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मंगळवारी (१४ ऑक्टोबर २०२५) आपल्या पहिल्या उमेदवार यादीची घोषणा केली. या यादीत एकूण ७१ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून, अनुभवी नेते नंदकिशोर यादव यांचे तिकीट रद्द करून रत्नेश कुशवाह यांना पाटणा साहिब मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच काही विद्यमान मंत्र्यांचेही तिकीट कापण्यात आल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

या पहिल्या यादीत भाजपने एनडीएतील जागावाटपानंतर १०१ जागांपैकी ७१ जागांसाठी उमेदवार निश्चित केले आहेत. उर्वरित जागांसाठी उमेदवारांची घोषणा दुसऱ्या यादीत केली जाईल. पार्टीच्या या निर्णयामुळे अनेक ज्येष्ठ नेत्यांची जागा नव्या चेहऱ्यांना देण्यात आली असून, नव्या पिढीला प्रोत्साहन देण्याचा स्पष्ट संदेश पक्षाने दिला आहे.

यादीनुसार, औरईमधून मंत्री रामसुरत राय, तसेच रीगा मतदारसंघातून मंत्री मोतीलाल प्रसाद यांचे तिकीट रद्द करण्यात आले आहे. त्याचवेळी, आरोग्य मंत्री मंगल पांडे यांना सिवानमधून उमेदवारी देण्यात आली आहे. माजी खासदार सुनील कुमार पिंटू, जे पूर्वी जनता दल (युनायटेड) मध्ये होते आणि नंतर पुन्हा भाजपमध्ये परतले, त्यांना सीतामढी मधून उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपने नव्या चेहऱ्यांनाही मोठी संधी दिली आहे. खजौली मतदारसंघातून अरुण शंकर प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली असून ही जागा पूर्वी उपेंद्र कुशवाह यांच्याकडे जाण्याची चर्चा होती. महिलांना प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीने गायत्री देवी (परिहार), कविता देवी (कोऱ्हा), स्वीटी सिंग (किशनगंज) आणि अरुणा देवी (वारिसालीगंज) यांचाही समावेश पहिल्या यादीत करण्यात आला आहे.

यादीतील काही महत्त्वाच्या उमेदवारांची नावे अशी आहेत – रेणू देवी (बेतिया), प्रमोद कुमार सिन्हा (रक्सौल), श्यामबाबू प्रसाद यादव (पिप्रा), राणा रणधीर सिंग (मधुबन), तारकिशोर प्रसाद (कटिहार), आलोक रंजन झा (सहरसा), संजय सरावगी (दरभंगा), कुंदन कुमार (बेगुसराय), सम्राट चौधरी (तारापूर), विजय कुमार सिन्हा (लखीसराय), सुनील कुमार (बिहार शरीफ), नितीन नवीन (बंकीपूर) आणि श्रेयसी सिंग (जमुई).

दरम्यान, पाटणा साहिबमधून तिकीट नाकारण्यात आलेल्या ज्येष्ठ नेते नंदकिशोर यादव यांनी अत्यंत संयमित प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मी भारतीय जनता पक्षाच्या निर्णयासोबत आहे. पक्षाने मला खूप काही दिले आहे. माझी कोणतीही नाराजी नाही. नवीन पिढीचे स्वागत आहे आणि त्यांचे अभिनंदन करतो. पाटणा साहिब विधानसभेच्या मतदारांनी मला सलग सात वेळा निवडून दिले आहे, त्यांच्या प्रेमाचे मी ऋणी आहे.”