जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आषाढी वारीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत जळगावकरांना वारकरी संप्रदायाची भक्ती, समता आणि संस्कृतीचा भावस्पर्शी अनुभव देणाऱ्या परिवर्तन निर्मित ‘पालखी’ या गाजलेल्या नाटकाचा विशेष प्रयोग शुक्रवार, दि. २४ जुलै रोजी रात्री ८ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव येथे सादर करण्यात येणार आहे. वारकरी परंपरेचे वैभव रंगभूमीवर जिवंत करणाऱ्या या नाट्यप्रयोगाची रंगप्रेमी आणि विठ्ठल भक्तांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
साहित्यिक दि. बा. मोकाशी यांच्या गाजलेल्या कादंबरीवर आधारित या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन शंभू पाटील यांनी केले आहे. वारकरी संप्रदायातील भक्ती, समता, माणुसकी, विठ्ठलभक्तीचा आध्यात्मिक प्रवास आणि वारीचे सांस्कृतिक महत्त्व प्रभावी नाट्यरूपातून प्रेक्षकांसमोर उलगडले जाते. अभंग, कीर्तन आणि भावपूर्ण प्रसंगांमुळे हे नाटक प्रेक्षकांना वारकरी परंपरेचा जिवंत अनुभव देते. ‘पालखी’ या नाटकाचे प्रयोग यापूर्वी मुंबई, कलकत्ता तसेच महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये यशस्वीरीत्या सादर झाले असून प्रेक्षकांसह समीक्षकांनीही त्याचे कौतुक केले आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने जळगावातील रसिकांनाही हा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अनुभव घेता यावा, या उद्देशाने अनिशभाई शाह, अनिलभाई कांकरिया, किरण बच्छाव, नंदलाल गादिया, अमर कुकरेजा, छबीराज राणे आणि नारायण बाविस्कर यांच्या संकल्पनेतून या विशेष प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे ४५ कलाकारांचा सहभाग असलेल्या या भव्य नाट्यप्रयोगात वारकरी परंपरेचे विविध पैलू प्रभावीपणे साकारले जाणार आहेत. विठ्ठलभक्ती, अभंग, कीर्तन, मानवी मूल्ये आणि भक्तिमय वातावरणाचा सुंदर संगम या नाटकातून अनुभवता येणार आहे. परिवर्तन निर्मित हा प्रयोग भक्ती, संस्कृती आणि रंगभूमी यांचे अनोखे दर्शन घडवणारा ठरणार आहे.

या नाटकात मंजुषा भिडे, वसंत गायकवाड, नारायण बाविस्कर, होरीलसिंग राजपूत, मंगेश कुलकर्णी, अक्षय नेहे, नेहा पवार, श्वेतांबरी गरुड, हर्षल पाटील यांच्यासह सुमारे ४५ कलाकार विविध भूमिका साकारत आहेत. कलाकारांच्या अभिनयासह संगीत, नेपथ्य आणि सादरीकरणामुळे हा प्रयोग अधिक प्रभावी ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. हा नाट्यप्रयोग सर्वांसाठी खुला असून प्रवेशिका उपलब्ध आहेत. इच्छुकांनी प्रवेशिकांसाठी अक्षय नेहे (मो. ७७९८२ ६६८७५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परिवर्तन संस्थेच्या वतीने डॉ. किशोर पवार, डॉ. मनोज पाटील, लीना लेले, प्रवीण पाटील, सुनील बारी आदींनी जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय आणि सांस्कृतिक पर्वाचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे.



