जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा शुभारंभ अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांच्या हस्ते दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी शिबिराचा लाभ घेण्यासाठी आलेले रुग्ण, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच आरोग्य विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेले हे महाआरोग्य शिबिर २२ ते २९ जुलै या कालावधीत जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका रुग्णालयांमध्ये राबविण्यात येणार आहे. या उपक्रमातून सर्वसामान्य नागरिकांना विविध आरोग्य तपासण्या, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि आवश्यक वैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

शुभारंभानंतर शिबिराविषयी माहिती देताना अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी सांगितले की, शासनाच्या निर्देशानुसार या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांच्या देखरेखीखाली विविध आजारांच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. रुग्णांचे अचूक निदान करण्यासाठी अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामुग्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेषतः महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करणे व वेळेत निदान होण्यासाठी आवश्यक तपासण्या करणे, हा या शिबिराचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या महाआरोग्य शिबिरात रक्तदान शिबिर, स्तनाच्या कर्करोगाची तपासणी, अस्थीव्यंग निदान, डोळ्यांची तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नोंदणी, स्थूलता व उच्च रक्तदाब तपासणी, हर्निया, थॅलेसेमिया, मधुमेह तपासणी तसेच कृत्रिम अवयव व पुनर्वसनासंदर्भातील तपासणी, मार्गदर्शन आणि जनजागृती केली जाणार आहे. विविध आजारांचे वेळेत निदान होऊन नागरिकांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी शिबिरात सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या उपक्रमामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा सुलभपणे उपलब्ध होणार असून प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीबाबत जनजागृतीही वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी २९ जुलैपर्यंत सुरू असलेल्या या महाआरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



