जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरी जाण्यासाठी नवीन बसस्थानकावर आलेले असताना बसने धडक देत चाक पायावरून गेल्याने सय्यद हिसामोद्दीन सय्यद मुसा (६५, रा. फत्तेपूर, ता. जामनेर) यांचा पाय निकामी झाला आहे. ९ ऑगस्ट रोजी घडलेल्या या अपघातप्रकरणी बुधवारी १ नोव्हेंबर रोजी बसचालकाविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भांडी विक्रीचा व्यवसाय करणारे सय्यद हिसामोद्दीन हे ९ ऑगस्ट रोजी जळगाव बसस्थानकात आले व ते जामनेर बसची वाट पाहत होते. त्यावेळी समोरुन एक बस (क्र. एमएच १४, बीटी १९७६) थेट सय्यद यांच्या अंगावर आली. त्यात ते खाली पडले व बसचे चाक उजव्या पायावरून गेले. त्या वेळी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
तेथून भुसावळ येथे खासगी रुग्णालयात व तेथून पुन्हा छत्रपती संभाजीनगर येथे घाटी हॉस्पिटल येथे दाखल केले. तब्येतीत सुधारणा न झाल्याने सय्यद यांचा उजवा पाय गुडघ्यापासून कापावा लागला. त्यानंतर बुधवार, १ नोव्हेंबर रोजी सय्यक यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून बसचालक सय्यद कमरोद्दीन सय्यद शमशोद्दीन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.