पत्ते खेळण्यास मनाई केल्याच्या कारणावरून तरूणाला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील राजमालती नगरात पत्ते खेळण्यास मनाई केल्याच्या कारणावरून एका तरूणाला तीन जणांकडून लोखंडी रॉडने मारहाण करून दुखापत केली. तर त्याच्या कुटुंबाला शिवीगाळ व दमदाटी केल्याचा प्रकार ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी बुधवारी १ नोव्हेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील राजमालती नगरात बंटी नरसिंग राठोड (वय-३२) हा तरूण आई व बहिण सोबत वास्तव्याला आहे. हमालीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवारी ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता त्यांच्या घराजवळ काहीजण पत्ते खेळत होते. त्यावेळी बंटी राठोड याने पत्ते खेळण्यास मनाई केली. याचा राग आल्याने नरबधा प्रसाद उर्फ मामा, दौलत सखाराम चव्हाण रा. लक्ष्मीनगर, जळगाव आणि कालु (पुर्ण नाव माहित नाही) रा. राजमालती नगर, जळगाव या तिघांनी लोखंडी रॉड बंटीच्या डोक्यात टाकून दुखापत केली.

तर बंटीच्या आई व बहिण यांना शिवीगाळ करून दमदाटी केल्याची घटना घडली. याप्रकरणी तरूणाने शहर पोलीसात धाव घेवून फिर्याद दिली आहे. त्यानुसार बुधवार १ नोव्हेंबर रोजी रात्री १ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरूषोत्तम वाघळे करीत आहे.

Protected Content