सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तहसील कार्यालयात दाखल्यांसह अन्य बाबींसाठी विलंब होत असल्याने सावदा येथे निवासी नायब तहसीलदारांचे कार्यालय सुरू करावे अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख सूरज परदेशी यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.
शिवसेनेचे शहरप्रमुख सूरज परदेशी यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की, सावदा तसेच परिसरातील सुमारे ४० गावांमधील आबालवृध्दांना दाखले तसेच अन्य शासकीय अत्यावश्यक कामांसाठी रावेर तहसील कार्यालयात जावे लागते. येथे कामांना विलंब लागत असल्याने एकाच कामासाठी अनेकदा जावे लागते. यामुळे लोकांची पायपिट होतांनाच त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
या निवेदनात पुढे नमूद केले आहे की, सावदा हे परिसरातील मध्यवर्ती शहर असून याला सुमारे ४० खेडी जोडलेली आहेत. येथे नायब तहसील कार्यालय केल्यास परिसरातील नागरिकांनी सर्व प्रकारचे दाखल मिळविण्यासाठी रावेर येथे जावे लागणार नाही. परिणामी लोकांची पायपिट वाचेल. यामुळे सावदा येथे निवासी नायब तहसीलदार यांचे कार्यालय सुरू करावे अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. हे निवेदन आमदार चंद्रकांत पाटील यांना देऊन या समस्येचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
निवेदन प्रसंगी उपस्थित माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, शिवसेना शहर प्रमुख सुरज परदेशी, माजी नगरसेवक फिरोज खान, संजय गांधी समितीचे सदस्य फिरोज लेफ्टी, माजी नगरसेवक संजय चौधरी, युवा उद्योजक रितेश पाटील, गजू लोखंडे, युवा सेना शहरप्रमुख मनीष भंगाळे, चेतन नेमाडे, गणेश माळी,अजय भागवत कासार,संतोष कासार, राकेश कासार,प्रदीप कासार,भूषण प्रकाश कासार,प्रशांत कासार,अनिल कासार आदी उपस्थित होते.