पीजे रेल्वेमार्गाच्या पदरी पुन्हा निराशा; घोषणा हवेतच !

पाचोरा | गणेश शिंदे । वैभवशाली वारसा असणार्‍या पाचोरा-जामनेर अर्थात पीजे रेल्वेमार्गाला या वर्षाच्या अर्थसंकल्पातही काहीच पदरात पडले नसून याबाबत आजवर करण्यात आलेल्या सर्व घोषणा हवेतच विरल्याचे दिसून येत आहे.

पाचोरा-जामनेर या मार्गावर धावणार्‍या पीजे रेल्वेच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असून या काळात अनेक स्थित्यंतरांना सामोरे गेलेली ही छोटी गाडी अनेक वर्षांपासून ब्रॉडगेजचे स्वप्न उराशी बाळगून धावत आहे. या पी जे च्या पुढच्या वाटचालीसाठी प्रत्येक खासदार पाचोरा जामनेर करांना विविध प्रकारचे आश्‍वासन व घोषणा देतात, प्रवासीही सुखावतात. मात्र हे सुख क्षणिक ठरते. कारण रेल्वे मंत्रालयाकडून या बाबत कोणतीही ठोस कारवाई होत नाही. या वर्षाच्या अर्थसंकल्पातही हेच चित्र दिसून आल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

जिल्ह्यात रस्त्यांचे काँक्रिटीकरण, सहा पदरीकरण व उड्डाणपुलांचा ध्यास घेतलेल्या खासदारांनी पीजेबाबत सुखावह घोषणा केली. ब्रॉडगेज सोबतच पहूर ते अजिंठा लेणी व जामनेर ते बोदवड असे या रेल्वेचे विस्तारीकरण अपेक्षित आहे. खर तरं, गेल्या चार दशकांपासून ही मागणी पाचोरा व जामनेर तालुक्यातूून सातत्याने होत आहे. यापूर्वी रामविलास पासवान हे रेल्वेमंत्री असताना रेल्वे विभागाने सर्वेक्षणास सुरुवात केली होती. त्यावेळेस देखील कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. वाय.जी.महाजन हे खासदार असताना त्यांनी पाचोरा ते जामनेर असा प्रवास या गाडीने करून प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस ब्रॉडगेजच्या आश्‍वासनाबरोबरच या गाडीसाठी डबे वाढवून देण्याचे कबूल केले होते. याचप्रमाणे आजवर सर्व लोकप्रतिनिधींनी याबाबत वारेमाप घोषणा केल्या असल्या तरी प्रत्यक्षात काहीही कृती न झाल्याची बाब उघड आहे.

एकीकडे एस.टी.च्या भाड्यात वारंवार होणारी दरवाढ पाहता या मार्गावरील प्रवाशांसाठी अत्यल्प दरात सेवा देणरी पीजे म्हणजे लाईफ लाईनच ठरली आहे. पूर्वी कोळशाच्या इंजीनवर धावणारी ही गाडी आता डिझेल इंजीनवर धावत असून वेळेची बचत झाली आहे. त्यामुळे सध्या दोन फेर्‍या होत असलेल्या गाडीची आणखी एक फेरी वाढविणे शक्य आहे. स्थानिक पातळीवर याचा निर्णय घेणे शक्य असूनदेखील अनास्थेमुळे ही मागणी पूर्ण होऊ शकली नाही.

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी थेट रेल्वेशी जोडली जावी या हेतूने पाचोरा-शेंदुर्णी- पहूर व पुढे अजिंठापर्यंत नवीन मार्ग टाकता येणे शक्य आहे. तसेच जामनेर ते बोदवड असा मार्ग टाकून ही लाईन नागपूर मार्गाशी जोडता येईल. जिल्ह्यातील दोन्ही खासदारांच्या मतदारसंघातून पीजे धावत असल्याने दोन्ही खासदार केंद्रात सरकार असलेल्या भाजपचेच असल्याने त्यांनी यासाठी आपले राजकीय वजन वापरावे अशी अपेक्षा आहे. मात्र आजवर असे झाले नसल्याचे दिसून आले आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाकडून या भागातील जनतेला मोठ्या प्रमाणात अपेक्षा होत्या. तथापि, या रेल्वेमार्गाबाबत कोणताही निर्णय जाहीर न झाल्यामुळे जनतेतून संतापाचा सूर उमटला आहे.

2 Comments

  1. Eknath Devba koli
  2. Ganesh patil

Add Comment

Protected Content