पंतप्रधानांकडून अपेक्षा नाही – मनोज जरांगे

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधानांकडून अपेक्षा उरली नाही, मराठ्यांनी सुद्धा आता त्यांच्याकडून अपेक्षा सोडावी असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. तर, पंतप्रधान मोदींसमोर हात पसरवण्याची गरज नाही, आम्ही लढून आरक्षण मिळवणार असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावर बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, “पंतप्रधानांकडून अपेक्षा उरली नाही, मराठ्यांनी देखील त्यांची अपेक्षा सोडून द्यावी. त्यांचा महाराष्ट्रात येण्याचा आम्हाला काय फायदा आहे. तुम्ही सामान्यांचे नेतृत्व केलेला आहे, तुम्ही राज्य सरकारला आदेश देऊन टाका हे आम्ही त्यांना शिर्डीच्या दौऱ्यावर असतानाच आवाहन केले होते. जो सामान्यांच्या बाजूने बोलणार नाही, ज्याला सामान्यांची गरज राहिलेली नाही, त्यांच्याकडून अशा अपेक्षा करण्याची काय गरज आहे. ​​​​​​
मनोज जरांगे म्हणाले की, आम्ही लढून आरक्षण मिळवतो, हात पसरवण्याची गरज नाही. एकदा आम्ही त्यांना विनंती केली होती. राज्यात एवढे वातावरण ढवळून निघाले असतांना पंतप्रधानांनी त्यात हस्तक्षेप करणे गरजेचे होते. पंतप्रधानांनी आरक्षण देऊन टाका एवढ शब्द काढणे अपेक्षित होते.मात्र, आता त्यांच्याकडून मराठ्यांनी अपेक्षा सोडली आहे. त्यामुळे ते महाराष्ट्रात येऊ की कुठेही येऊ, मराठ्यांनी त्यांची अपेक्षा सोडावी, असेही जरांगे म्हणाले आहेत.
मनोज जरांगे म्हणाले की,आम्ही 20 जानेवारीला मुंबईला निघणारच, आम्हाला मुंबईला जाण्याची कोणतेही हौस नाही. मुंबईमध्ये सुद्धा आमचेच बांधव असून, त्यांनी होणार त्रास काही दिवस सहन करावा. विनाकारण मुंबईला त्रास देण्याचे काम सरकारच करत आहे. हे सर्व सरकार हाताने मुद्दाम करत आहे. सरकारमधील काही लोकांचा विरोध असून, ते अंधारातून विरोध करत आहेत. त्यांची नावे देखील जाहीर करणार आहोत. त्यामुळे, समाजाच्या विरोधात जाऊन पापाचे धनी होऊ नका. यांना गोरगरीब मराठ्यांची पोरं मोठी होऊ द्यायची नाहीत. त्यामुळे षडयंत्र रचले जात आहे. धोका झाला तरी भीतोय कोण?, नोटीसा देऊन काही होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Protected Content