कोरोना उपचारातून प्लाझ्मा थेरपी वगळली; नवीन दिशानिर्देश जारी

मुंबई प्रतिनिधी । कोरोनाचा प्रकोप वाढत असतांना याच्या उपचारातून आता प्लाझ्मा थेरपी हटविण्यात आली असून याबाबतचे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या उपचारासाठी वेळोवेळी उपचारांबाबत गाईडलाईन्स जारी करण्यात येतात. या अनुषंगाने कोरोना टास्क फोर्सने आता नवीन दिशानिर्देश जारी केले आहेत. यात कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटवण्यात आली आहे. याबाबत नवे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपी प्रभावी नाही, अनेक प्रकरणांत तिचा अयोग्य वापर करण्यात आला आहे, असे तज्ञांचे म्हणणे होते. काही डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांना पत्र लिहून प्लाझ्मा थेरपी हटवण्याची मागणी केली होती. प्लाझ्मा थेरपीचा तर्कहीन आणि गैर-वैज्ञानिक वापर केला जात आहे, असा इशाराही त्यांनी दिला होता. असेच पत्र आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव आणि एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनाही पाठवण्यात आले होते. त्यात म्हटले होते की, प्लाझ्मा थेरपी सध्याच्या दिशानिर्देशांवर आधारित नाही. कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपीचा काहीही उपयोग नाही, हे सध्या होत असलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. तरीही देशभरातील रुग्णालयांत तिचा वापर केला जात आहे. दरम्यान, दुसरीकडे या थेरपीसाठी रुग्णांना आवाहन केले जात होते.

दरम्यान, केंद्रीय पातळीवरून प्लाझ्मा थेरपी बंद करण्याचे निर्देश देण्यात आल्यानंतर आता स्थानिक पातळीवरही याची अंमलबजावणी होणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content