जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरातील प्रतिकूल परिस्थिती, शाळेची भीती असो वा शिक्षणात फारशी आवड नसणे असो…अन् त्यात आड आलेले वय (म्हणजे उलटून गेलेले वय) यामुळे शिक्षणाची विस्कटलेली घडी आता पुन्हा एकदा बसण्याची चिन्हे आहेत. होय, ‘मुंबई स्थित टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या नवभारत साक्षरता अभियानांतर्गत शिवाजीनगर येथील महानगरपालिकेच्या मध्यवर्ती शाळा क्रमांक एक येथे प्रौढ शिक्षणासाठी आता रात्रशाळा प्रकल्प सुरू झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील प्रौढ साक्षरता वर्गाला पुन्हा नवी उभारी मिळण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या रात्रशाळा उपक्रमाचे उद्घाटन बुधवारी (दि.२० सप्टेंबर) त्यांच्याच हस्ते करण्यात आले. यावेळी परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, महानगरपालिका उपायुक्त अभिजीत बाविस्कर, शिक्षणाधिकारी दीपाली पाटील, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे विद्यार्थी मुकेश मुनेश्वर आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, प्रौढ साक्षरतेला चालना देण्यासाठी, विशेषत: स्थलांतरित आणि समाजातील दुर्बल घटकांमध्ये शिक्षणाची गंगा आणण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेच्या औपचारिक क्षेत्रात सामील होण्यासाठी शालेय शिक्षणाची पात्रता ही एक महत्त्वाची आवश्यकता आहे. गरिबीतून बाहेर पडण्यास शिक्षण हे महत्त्वाची भूमिका बजावते. शिक्षण व्यक्तीला फसवणूकीपासून वाचवते. शिक्षणाचे महत्त्व ओळखून प्रत्येक व्यक्ती साक्षर व्हावी. यासाठी जळगाव जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. असे ही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
मुकेश मुनेश्वर म्हणाले, रात्रशाळेचा प्राथमिक उद्दिष्ट १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण प्रदान करणे आहे. ज्यांच्याकडे साक्षरता कौशल्ये नाहीत, त्यांना इयत्ता १० वी पर्यंतचे शिक्षण देणे हे ध्येय आहे.या उपक्रमात शिक्षण घेण्यासाठी इच्छुक ४७ जणांची नोंदणी करण्यात आली आहे. यापैकी ३० जण पहिल्या दिवशी उपस्थित होते. २०२७ पर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे. उपक्रमात स्वेच्छेने सहभागी होवून शिकविण्याचे काम करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा असल्यास ९५७९९००२८० या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन ही श्री मुकेश यांनी केले.
उपक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींनी त्यांना पुन्हा शिक्षणाचे द्वार उघडले झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. शिक्षणाच्या माध्यमातून कुटुंबाला पुढे नेण्यासाठी निश्चितच फायदा होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधतांना प्रौढ शिक्षण वर्गात प्रवेशित व्यक्तींनी मत व्यक्त केले.