कापूस खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांना टोकन दिल्यास कारवाई करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रावर किमान आधारभूत दराने करण्यात येत असलेली कापूस खरेदी पारदर्शीपणे पार पाडा, कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना टोकन दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सहकार, कापूस पणन महांसघ व सीसीआयच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते.  या बैठकीस जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक आर. डी. होले, उपव्यवस्थापक ए. बी. निकम, जामनेर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रसाद पाटील, जळगावचे आर. के. पाटील, पारोळाचे आर. डी. चौधरी, चोपडाचे एन. आर. सोनवणे, सीसीआयचे सहायक प्रबंधक दिनेशकुमार, केंद्र प्रभारी प्रमोद पाटील यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, कृषि उत्पन्न बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. त्यामुळे किमान आधारभूत दराने कापूस खरेदी प्रक्रिया राबवितांना शेतकरी हितास प्राधान्य द्यावे. कापूस खरेदी केंद्रावर खरेदी करतांना शेतकऱ्यांचा कापूस कमीत कमी वेळात घेता येईल यासाठी नियोजन करावे. शेतकऱ्यांना खरेदीचे टोकन देताना त्याचे चित्रीकरण करणे आवश्यक आहे. जेणेकरुन कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येणार नाही. कापूस खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना आठ दिवसात त्यांची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करावे. यासाठी शेतकऱ्यांचे बँकखाते आधार लिंक असणे आवश्यक असल्याची जाणीव शेतकऱ्यांना करुन द्यावी. खरेदीची प्रक्रिया राबविताना शासनाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन होईल याची सर्व केंद्रावर खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 

भविष्यात खरेदी केलेला कापूस ठेवण्यासाठी गोडवूनची अडचण येण्याची शक्यता बैठकीत व्यक्त करण्यात आली. यासाठी आतापासूनच गोडावून भाड्याने घेण्याचे नियोजन सीसीआय व पणन महासंघाने करावे. याकरीता बुलढाणा अर्बनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. सद्यपरिस्थितीमध्ये जिल्ह्यात सीसीआय व कापूस पणन महांसघामार्फत जिल्ह्यातील 10 तालुक्यात एकूण 34 केंद्रांवर कापूस खरेदी सुरु असून आतापर्यंत सीसीआयच्या 11 केंद्रावर 3654 शेतकऱ्यांचा 1 लाख 40 हजार 939 क्किटंल कापूस खरेदी केला आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी बैठकीत दिली.

 

 

 

Protected Content