प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण

 

चोपडा, प्रतिनिधी । श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य चोपडा शाखेच्या, वतीने राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण नंदूरबार जिल्ह्यातील तळोदा येथे खासदार हीना गावित यांच्या हस्ते करण्यात आले.

श्री संत सावता माळी युवक संघातर्फे संविधान दिन, क्रांतिसूर्य ज्योतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त पुण्यतिथी निमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जवळपास २०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.  या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभा तळोदा येथे सावता भवनात ३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले. खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना बक्षिसाच्या रकमेचा चेक, सन्मानपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळी समाजाचे अध्यक्ष अरविंद मगरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक संजय बबनराव माळी, हेमालाल मगरे, महिला बाल कल्याण सभापती अंबिका राहुल शेंडे, प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन हे उपस्थित होते.

खासदार डॉ. हिना गावित यांनी स्वतःच्या जीवनातील अनेक पैलूंचा उलगडा विद्यार्थ्यांसमोर केला तसेच मनुष्याने आपले शिक्षण अविरत चालू ठेवावे व स्वतः देखील एक खासदार असून सद्यस्थितीला आपण देखील अजून शिक्षण घेत आहोत ही बाब प्रकर्षाने नमूद केली.

विजयी स्पर्धकांना संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी फोनद्वारे शुभेच्छा देऊन भविष्यातील वाटचालीसाठी युवक संघाच्या वतीने काही मदत लागल्यास युवक संघाचे सर्व पदाधिकारी तत्पर असल्याचे विद्यार्थ्यांना आश्वस्त केले. याप्रसंगी संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी उपस्थितांना युवक संघाच्या सामाजिक कार्याची प्रचिती करून दिली.

Protected Content